मुंबईकरांना थर्टी फर्स्ट आणि नाताळचे वेध लागल्याने चाकरमान्यांनी निसर्गरम्य कोकण आणि गोव्याची वाट धरली आहे. नाताळच्या सुट्ट्या आणि वीकेंडचा मुहूर्त साधत आज हजारो मुंबईकर कुटुंबकबिल्यासह खासगी गाड्यांसह मिळेल त्या वाहनाने कोकणाकडे निघाल्याने ऐन सायंकाळच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर माणगावात वाहनांच्या तब्बल 10 किलोमीटर रांगा लागल्या.
नवीन वर्ष सुरू होण्यास अवघे आठ दिवस शिल्लक राहिल्याने नववर्ष स्वागताचे वेध लागले आहेत. यातच नाताळही एका दिवसावर आला आहे. त्यामुळे सुट्टीत कोकणाला मुंबईकर-पर्यटकांची पहिली पसंती दिली असून मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यातच रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करीत मार्ग काढावा लागत आहे. प्रचंड वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांसह रखडलेल्या नियमित प्रवाशांचेही हाल झाले.
मंत्री गोगावलेही लटकले!
माणगाव येथे दहा किमीच्या रांगा लागल्याने काही मिनिटांच्या प्रवासासाठी प्रवाशांची तासन्तास रखडपट्टी झाली. या पर्यटक-प्रवाशांमध्ये लहान मुलांसह ज्येष्ठ, महिलांचाही समावेश असल्याने त्यांचे प्रचंड हाल झाले. विशेष म्हणजे खुद्द रोजगार हमी फलोत्पादन मंत्री भरत गोगावलेदेखील या वाहतूककोंडीत लटकले.