Who is Simran Shaikh: धारावीच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या इलेक्ट्रिशियनच्या मुलीवर पैशांचा पाऊस, वाचा सिमरन शेखचा प्रवास
Times Now Marathi December 23, 2024 07:45 PM

Simran Shaikh Journey: महिला प्रीमियर लीग 2025 च्या लिलावात चार खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागली. या लिलावात भारताची अनकॅप्ड फलंदाज सिमरन शेख ही सर्वात महागडी खेळाडू ठरली. तिला गुजरात जायंट्सने 1.90 कोटी रुपयांना विकत घेतले. गुजरातने सिमरनला मूळ किमतीपेक्षा 19 पट अधिक किमतीत खरेदी केले. यामुळे सिमरनचे नशीब उजळले आहे. ती अत्यंत गरीब कुटूंबातून येते. तिच्या संपूर्ण प्रवासाबद्दल माहिती जाणून घेऊयात.

धारावीत बालपण

सिमरन शेकने आपले आयुष्य मुंबईतील धारावीच्या झोपडपट्टीत घालवले. सिमरनने अभ्यास सोडून क्रिकेटची निवड केली. याच क्रिकेटने तिला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे. सिमरन पॉवर हिटर असून खालच्या क्रमांकवर खेळताना षटकार मारण्याची क्षमता तिच्यात आहे. ती एकहाती सामना फिरवू शकते, याच कारणामुळे गुजरातने त्याचा संघात समावेश केला.




सिमरनने मानले पालकांचे आभार

22 वर्षीय सिमरन शेखने या लिलावानंतर भावूक प्रतिक्रिया देत म्हटले की, 'मी गुजरात जायंट्स परिवाराचे आभार मानते. एवढी मोठी रक्कम मिळाल्यानंतर आता संघासाठी माझे सर्वोत्तम देणे ही माझी जबाबदारी आहे. धारावीसारख्या भागात मुलींच्या खेळासाठी फारसा पाठिंबा मिळत नाही, परंतु माझ्या कुटुंबाने तिला नेहमीच प्रोत्साहन दिले. त्यांचीही मी आभारी आहे. सिमरन शेख पुढे बोलताना म्हणाली की, 'विराट कोहलीला भेटण्याचे माझे स्वप्न आहे.




वडील करतात इलेक्ट्रिशियनचे काम

सिमरन शेखचा जन्म 12 जानेवारी 2002 रोजी धारावीत झाला. ती 2022 मध्ये WPL च्या पहिल्या सीजनमध्ये UP वॉरियर्स संघाचा भाग होती, परंतु खराब कामगिरीमुळे तिला पुढील हंगामापूर्वी रिलीज करण्यात आले. त्यानंतर गेल्या मोसमात ती विकली गेली नाही. सिमरनचे वडील इलेक्ट्रिशियन आहेत. तिला 4 बहिणी आणि 5 भाऊ आहेत. ती अगदी लहान वयात मुंबईतील धारावी भागातील मुलांसोबत क्रिकेट खेळायची. मात्र, सिमरनचा क्रिकेट प्रवास युनायटेड क्लबमध्ये आल्यानंतर सुरू झाला. आता तिला भारताकडून खेळण्याची इच्छा आहे.

मला फक्त भारताची जर्सी हवी - सिमरन

सिमरन शेख भविष्यातील योजनेबाबत बोलताना म्हणाली की, 'मी गुजरात जायंट्स परिवाराचे आभार मानते. मी माझ्या पालकांचेही आभार मानते कारण माझ्या समाजात अशा गोष्टींना फारसा पाठिंबा नाही, पण त्यांनी मला नेहमीच पाठिंबा दिला. आता मला फक्त भारताची एक जर्सी हवी आहे आणि म्हणूनच मी हे सर्व प्रयत्न करत आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.