इचलकरंजी : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून जादा परतावा मिळवून देण्यासह अधिक नफ्याचे आमिष दाखवून इचलकरंजीतील एका डॉक्टरची तब्बल ९३ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणी अॅक्सीस स्टॉक एक्स्चेंज कंपनीचे मुख्य केरसी तावडीया, सहायक राशी अरोरा व कंपनीचे सिक्युरिटी कस्टमर केअर या तिघांवर गुन्हा दाखल केल्याचे शिवाजीनगर पोलिसांनी सांगितले. याबाबत डॉ. दशावतार गोपाळकृष्ण बडे (वय ५६, रा. गुलगुंजे गल्ली, जवाहरनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः शेअर मार्केटमधील गुंतवणुकीसंदर्भात डॉ. बडे यांना इन्स्टाग्रामवरून माहिती मिळाली. त्यावरून गुंतवणुकीची लिंक त्यांनी डाऊनलोड करून घेतली. त्यानंतर त्यांची संबंधित व्यक्तींसोबत व्हॉटस्-अॅप ग्रुपवरून संदेशाची देवाण-घेवाण झाली. १५०० रुपयांप्रमाणे पाचवेळा त्यांनी रक्कमही गुंतवली. त्यानंतर त्यांचे शेअर मार्केटसंदर्भातील खाते उघडले गेले. त्यांनी त्या खात्यावर काही रक्कमही गुंतवली. त्यानंतर त्यांच्या शेअर मार्केटच्या खात्यावरील नफ्याची रक्कम वाढत गेली.
दरम्यान, संशयितांनी डॉ. बडे यांचा विश्वास संपादन केला. आयपीओमध्ये गुंतवणूक करावी, ९१ ते २५१ टक्के लाभ मिळवून देऊ, असे आमिष त्यांनी त्यांना दाखवले. त्याप्रमाणे त्यांनी गेल्या १३ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत वेगवेगळ्या खात्यांत ९३ लाख ३५ हजार रुपये भरले. त्यानंतर त्यांच्या शेअर मार्केटच्या खात्यावर चार कोटी रुपये जमा झाल्याचे दिसले. ही रक्कम काढता येते का, अशी विचारणा डॉ. बडे यांनी वेळोवेळी केली.
रक्कम काढायची असेल, तर पुन्हा ६५ लाख रुपये भरावे लागतील, असे त्यांना सांगण्यात आले. यावरून डॉ. बडे यांना संशय आला. यामध्ये आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
अखेर डॉ. बडे यांनी आज कंपनीच्या तिघांनी संगनमताने ९३ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक सचिन पाटील तपास करीत आहेत.
सायबर विभागाकडून चौकशी सुरूफसवणुकीची रक्कम मोठी आहे. ऑनलाईन पद्धतीने फसवणूक केल्याने सायबर विभागाकडून संबंधित कंपनीची माहिती घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यानंतरच संबंधित कंपनी, संशयित कुठले आहेत, हे समजणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.