विधानसभेमध्ये महायुतीला भरघोस यश मिळाले. मुख्यमंत्रीयांनी खातेवाटपाचा तिढा सोडवला. खातेवाटपानंतर महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये पालकमंत्रीपदावरुन रस्सीखेच सुरु झाल्याचे पाहायला मिळते. एकापेक्षा जास्त पक्षाचे नेते त्याच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावर दावा करत आहेत. परिणामी मुख्यमंत्र्याना पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीबाबत कसरत करावी लागणार आहे. दरम्यान जिल्ह्यात पक्षाचे आमदार जास्त, तेथे त्या-त्या पक्षाला पालकमंत्रीपद मिळणार असल्याची माहिती महायुतीतील सूत्रांनी दिली आहे.
पालकमंत्रीपदावरुन कोणत्या जिल्ह्यांमध्ये रस्सीखेच सुरु आहे?
रायगड: मागच्या सरकारमध्ये रायगडचे पालकमंत्रीपद अजित पवाराच्या राष्ट्रवादीतील अदिती तटकरेंकडे होते. रायगडमध्ये शिवसेनेचे ३, भाजपचे ३ आणि राष्ट्रवादीचे १ आमदार आहेत. तेव्हा फॉर्म्युल्यानुसार, शिवसेना किंवा भाजपकडे पालकमंत्रीपद जाऊ शकते. मागे शिवसेनेच्या भरत गोगावलेंनी पालकमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता अदिती तटकरे आणि भरत गोगावले दोघेही मंत्रिमंडळात आहेत. तेव्हा भरत गोगावले पालकमंत्रीपदावर दावा करु शकतात. तसेच जिल्ह्यावर पकड ठेवण्यासाठी अदिती तटकरेंकडे पालकमंत्रीपद यावे यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे प्रयत्नशील आहेत.
बीड: धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोघेही मंत्री आहेत. दोघांकडेही बीडच्या पालकमंत्रीपदाचा अनुभवही आहे. धनंजय आणि पंकजा यांपैकी पालकमंत्री कोण होणार याबाबत उत्सुकता आहे. बीडमधील राजकीय स्थिती पाहता धनंजय मुंडेना भाजप विरोध करत आहे. त्यामुळे पंकजा मुंडे बीडच्या पालकमंत्री होऊ शकतात असे म्हटले जात आहे.
छत्रपती संभाजीनगर: शिवसेनेच्या संदिपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांच्याकडे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्रीपद होते. जिह्यात शिवसेनेचे ६ आणि भाजपचे ३ आमदार आहेत. संख्याबळावरुन शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी पालकमंत्री मीच होणार असा दावा केला. तर सलग तिसऱ्यांदा निवडून आल्याने अतुल सावे पालक मंत्री व्हावेत अशी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे.
नाशिक: विधानसभेत नाशिकमध्ये राष्ट्रवादी गटाचे ७ आमदार विजयी झाले. तर भाजपचे ५ आमदार निवडून आले. तेव्हा राष्ट्रवादीकडे मंत्रीपद जावे असे राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे. तर पक्षविस्तारासाठी पालकमंत्रीपद आपल्याकडे यावे असा भाजपकडून आग्रह होत आहे.
मुंबई: आगामी महानगरपालिका लढवण्याच्या उद्देशाने मुंबईतील एक जिल्हा आमच्याकडे असावा असा शिवसेनेचा आग्रह आहे. मागे शिवसेनेचे दीपक केसरकर हे मुंबई उपनगराचे पालकमंत्री होते. तर भाजपच्या मंगलप्रभात लोढांकडे मुंबई शहराची जबाबदारी होती. भाजपला मुंबईतील दोन्ही जागा आपल्या ताब्यात हव्या आहेत.
सातारा: साताऱ्यामध्ये शिवसेनेचे २, राष्ट्रवादीचे २ तर भाजपचे ४ आमदार निवडून आले आहेत. तेव्हा जिह्याचे पालकमंत्रीपद भाजपकडे जाऊ शकते. पण मागच्या सरकारमधील पालकमंत्री शंभूराजे देसाईदेखील पालकमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचे म्हटले जात आहे.