भारतीय संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. तीन सामने झाले असून दोन सामने शिल्लक आहेत. आर अश्विनने तिसऱ्या सामन्यानंतर निवृत्ती घेतल्यानंतर संघात एक जागा रिक्त आहे आणि ही जागा मोहम्मद शमीच्या रुपाने भरली जावी अशी अनेकांची इच्छा आहे. पण मोहम्मद शमी यासाठी फिट अँड फाईन आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. रोहित शर्मानेही याबाबत आपलं मत स्पष्ट करत एनसीएच्या कोर्टात चेंडू टाकला होता. त्यात शमी देशांतर्गत क्रिकेट खेळत असताना त्याला संधी मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत होतं. आता बीसीसीआयने या प्रकरणी स्पष्टीकरण देत जे काय आहे ते स्पष्ट केलं आहे. बीसीसीआयने मोहम्मद शमीच्या दुखापतीबाबत अपडेट दिलं आहे. मोहम्मद शमीला टाचेची दुखापतआहे. त्यातून तो पूर्णपणे बरा झाला नाही असं बीसीसीआयने सांगितलं आहे. मोहम्मद शमीच्या उजव्या टाचेवर शस्त्रक्रिया झाली होती.
मोहम्मद शमी रणजी स्पर्धेत बंगालकडून खेळला. तसेच अचूक टप्प्याची गोलंदाजी करत क्रीडारसिकांची मनं जिंकली होती. तसेच विकेट घेत टीम इंडियात पुनरागमनासाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं होतं. सैयद मुश्ताक अली स्पर्धेतही मोहम्मद शमी 9 सामन्यात खेळला. पण मोहम्मद शमी बिनधास्त खेळत असला तरी गोलंदाजी करताना एक त्रास जाणवत आहे. बीसीसीआयने स्पष्ट करत सांगितलं की, त्याच्या डाव्या गुडघ्याला हलकी सूज येते. बऱ्याच महिन्यांनी गोलंदाजी करत असल्याने असं होत असावं. त्याची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर मेडिकल टीमने त्याला बरं होण्यासाठी अजून काही दिवसांचा आराम आवश्यक असल्याचं सांगितलं आहे.
बीसीसीआयच्या अपडेटमुळे मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियात जाणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे. तसेच विजय हजारे ट्रॉफीत त्याच्या गुडघ्याची सूज कशी आहे? यावर खेळणं अवलंबून असणार आहे. तसेच इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही खेळणं कठीण दिसत आहे. असं असताना मोहम्मद शमी फिट अँड फाईन होऊन थेट चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळला तर आश्चर्य वाटायला नको. पण चॅम्पियन्स ट्रॉफीतही संधी मिळाली नाही तर थेट आयपीएलमध्ये खेळताना दिसेल.