भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या एमसीजी मैदानावर खेळला जाणार आहे. 26 डिसेंबरपासून या सामन्याला सुरुवात होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीच्या दृष्टीने या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. त्यामुळे या सामन्यात बाजी मारण्यासाठी दोन्ही संघांनी कंबर कसली आहे. पण तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने निवृत्ती घेतल्याने एक जागा रिकामी झाली आहे. त्याची जागा भरून काढणं सोपं नसलं तरी नवा खेळाडू तयार करणं तितकंच गरजेचं आहे. बीसीसीआयने त्याच्या जागी एका युवा गोलंदाजाला पाठवण्याच निर्णय घेतला आहे. मुंबईचा ऑफस्पिनर तनुष कोटियनला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संधी दिली आहे. त्यामुळे विजय हजारे ट्रॉफीतून थेट दोन कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तनुष कोटियन मंगळवारी मेलबर्नला रवाना होणार आहे. तनुष कोटियन अश्विनसारखाचं ऑफस्पिनर आहे. तसेच तळाशी येऊन फलंदाजी करण्याची धमक आहे. अलिकडेच ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध कसोटी मालिकेत खेळला होता.
26 वर्षीय तनुष कोटियन नुकताच विजय हजारे ट्रॉफीत हैदराबादविरुद्धचा सामना खेळला. यात त्याने 10 षटकं टाकली. एक षटक निर्धाव टाकत 2 गडी बाद केले. तसेच फलंदाजीत 37 चेंडूत नाबाद 39 धावांची खेळी केली. त्याने मुंबईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्यामुळे त्याला बीसीसीआयने संधी दिली आहे. तनुष कोटियनने आतापर्यंत 33 प्रथम श्रेणी सामने खेळले असून 101 बळी घेतले आहेत. तसेच 1525 धावा केल्या आहेत. यात 2 शतके आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे. कोटियन गेल्या आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळला होता.
अश्विनऐवजी आता टीम इंडियात सामील झालेल्या तनुष कोटियनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार का, हा प्रश्न आहे. तनुष बुधवारी किंवा गुरुवारी ऑस्ट्रेलियात दाखल होणार असल्याने मेलबर्नमध्ये 26 डिसेंबरपासून चौथी कसोटी खेळली जाणार असल्याने शक्यता कमी आहे. मात्र, त्याला सिडनी येथे होणाऱ्या शेवटच्या कसोटीत खेळण्याची संधी मिळू शकते. मात्र, जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर संघात असल्याने तनुषला संधी मिळणे कठीण आहे.