विनोद कांबळीच्या आजाराचं निदान झालं, मेडिकल रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
GH News December 23, 2024 11:11 PM

भारताची माजी क्रिकेटपटू आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा लहानपणीचा मित्र विनोद कांबळीच्या आजाराबाबत धक्कादायक खुलासा झाला. तीन आठवड्यापूर्वी एका कार्यक्रमात हजेरी लावलेल्या विनोद कांबळीची प्रकृती पाहून अनेकांनी चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर शनिवारी 21 डिसेंबरला त्याला ठाण्याच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती खालावल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावं लागलं. रिपोर्टनुसार, विनोद कांबळीने दुखापत होत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. आता डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार होत आहेत. वेगवेगळ्या तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांना त्याच्या आजाराचं निदान झालं आहे. मेडिकल रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा झाला आहे. रिपोर्टनुसार कांबळीच्या मेंदूत रक्ताच्या गुठल्या झाल्या आहेत.

विनोद कांबळीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर विविध चाचण्या करण्यात आल्या होत्या. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, त्याच्या एका चाहत्याने त्याला रुग्णालयात दाखल केलं. ठाण्याच्या आकृती रुग्णालयात दाखल केलं असून तिथेच उपचार सुरु आहेत. कांबळीवर उपचार करणाऱ्या डॉ. विवेक त्रिवेदी यांनी सांगितलं की, सुरुवातील त्याला यूरिनरी इन्फेक्शन आणि ताण येत असल्याची तक्रार होती. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केलं. मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर त्याच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठल्या झाल्याचं निदान झालं आहे.

आजाराचं निदान झालं असलं तरी त्याचं गांभीर्य किती हे काही कळू शकलेलं नाही. रुग्णालयातील डॉक्टरांचं एक पथक त्याच्या तब्येतीकडे नजर ठेवून आहे. 24 डिसेंबर रोजी पुन्हा एकदा वैद्यकीय चाचणी केली जाईल. त्यानंतर पुढील उपचार ठरवण्यात येतील. दरम्यान, रुग्णालयाच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी कांबळीवर मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काही दिवस विनोद कांबळीवर उपचार केले जाणार आहेत. कांबळी बीसीसीआयकडून मिळणारी पेन्शन एकमेव उत्पन्नाचं स्त्रोत आहे. याबाबतचा खुलासा त्याने स्वत:च 2022 केला होता. बीसीसीआयकडून त्याला दरमहा 30 हजार रुपये पेन्शन मिळतं. विनोद कांबळीला दोन मुलं असून त्यांच्या देखभालीसाठी रिहॅबमध्ये जाण्याची तयारी दाखवली होती. यापूर्वी 14 वेळा विनोद कांबळी रिहॅबमध्ये गेला आहे. पण त्यात काहीच सुधारणा झाली नाही.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.