परभणी: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या परभणी दौऱ्यावर आहेत. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे नांदेड विमानतळावर स्वागत केले. परभणी हिंसाचारात मृत्यू झालेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतली आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यात त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच पोलिसांबाबत मोठा आरोप केला आहे.
10 डिसेंबर रोजी संध्याकाळी महाराष्ट्रातील परभणी येथील रेल्वे स्थानकाबाहेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या काचेच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर तणाव निर्माण झाला होता. यावेळी अनेक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यात सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता. यानंतर राजकारण पेटलं होतं. या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आज राहुल गांधी आले होते. राहुल गांधी यांनी सुर्यवंशी कुटुंबियांसोबत २० ते २५ मिनीटे चर्चा केली आहे. राहुल गांधी यांनी सुर्यवंशी कुटुंबियांचं सांत्वंन केले.
त्यानंतर राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यात त्यांनी पोलिसांवर मोठा आरोप केला आहे. यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या झाली आहे. या घटनेला मुख्यमंत्री जबाबदार आहेत. सोमनाथ सुर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे. पोलिसांनी सोमनाथ सुर्यवंशीला मारहाण करून त्याची हत्या केली आहे, असा खळबळजनक आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. यामुळे आता राजकारण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राहुल गांधी म्हणाले की, सोमनाथ सुर्यवंशी हा दलित होता म्हणून त्याच्यावर अन्याय करण्यात आला. त्याला मारहाण करण्यात आली आहे. दलित आहे म्हणून सोमनाथ सुर्यवंशीची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनीच त्याला मारलं आहे. या घटनेला आरएसएसची विचारधारा जबाबदार आहे. या ठिकाणी कोणतेही राजकारण होत नाही आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत खोटं बोलले आहेत, असं देखील राहुल गांधींनी यावेळी सांगितलं आहे. .
राहुल गांधी यांनी पोलीस कोठडीत मरण पावलेले आंबेडकरवादी सोमनाथ सूर्यवंशी आणि आंदोलनात सहभागी होताना मरण पावलेले विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे. तसेच यांना न्याय मिळण्याची मागणी केली आहे.