Maharashtra Politics News LIVE UPDATE : नितीन गडकरी यांच्या भेटीला पोचले बच्चू कडू; राजकीय घडामोडींना वेग...
Sarkarnama December 25, 2024 03:45 AM
Bachchu Kadu : नितीन गडकरी यांच्या भेटीला पोचले बच्चू कडू; राजकीय घडामोडींना वेग...

विधानसभा निवडणुकीला तिसरी आघाडी म्हणून समोरे गेलेले प्रहार जनशक्ती संघटनेचे बच्चू कडू यांना पराभवाला समोरं जावं लागलं. विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आहे. महायुतीच्या या बहुमतामुळे राज्याच्या राजकारणात इतर पक्ष सावध झाले असून, महायुतीशी जुळवून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यातच भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू भेट घेतली. नितीन गडकरी यांच्या वर्धा रोडवरील निवासस्थानी बच्चू कडू दाखल झाले. बच्चू कडू आणि नितीन गडकरी यांच्या भेटी मागे नेमकं काय कारण होतं, हे अजून समोर आलेलं नाही. या भेटीवर बच्चू कडू काय प्रतिक्रिया देतात याकडे आता लक्ष लागले आहे.

Women Aggressive in Chandrapur Against Illegal Liquor Sale : चंद्रपूरमध्ये अवैध दारूविक्री; संतप्त महिलांनी दारू विक्रेत्याची झोपडी पेटवून दिली

चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी पोलिस ठाण्यांतर्गत साठगाव, हिवरा आणि नागपूर जिल्ह्यातील बोरगाव इथल्या शेकडो महिलांनी जिल्ह्याच्या सीमेवर सुरू असलेली अवैध दारूविक्री बंद पडली. ज्या झोपडीतून दारूविक्री व्हायची, ती झोपडीही महिलांनी पेटवली. शेवटी पोलिसांनी दाखल होत दोन पुरुष आणि एका महिलेला ताब्यात घेतलं. घटनेच्या वेळी महिला संतप्त झाल्या आणि त्यांनी शेकडो दारूच्या बाटल्या फोडल्या. यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी तीन हजार रुपयांची दारू जप्त केली.

Uddhav Thackeray : मुंबईत 'शिव सर्वेक्षण यात्रा'; जानेवारीपासून शाखाप्रमुखांशी ठाकरे संवाद साधणार

मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 'शिव सर्वेक्षण यात्रा' सुरू करण्यात आली होती. मुंबईतील 36 विधानसभा क्षेत्रांसाठी नेमलेल्या निरीक्षकांनी आपला अहवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला असून, जानेवारीपासून उद्धव ठाकरे मुंबईतील सर्व शाखांना भेट देऊन शाखाप्रमुखांशी संवाद साधणार आहे. तसेच त्यांची मते जाणून घेणार आहेत. समोर कुणीही असले तरी लढणे थांबविणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतल्याचे दिसते. विधानसभेतील अपेक्षित यश मिळाले नसले, तरी त्यातून खचून न जाता उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची तयारी केली आहे. तसेच राज्यात आगामी येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला मैदानात उतरले आहेत.

Ulhasnagar Hit And Run : मद्यधुंद चालकाने कार चालवत तीन ते चार वाहनांना धडक दिली ; नऊ गंभीर जखमी

उल्हासनगरमध्ये हिट अँड रनची घटना घडली असून, मद्यधुंद चालकाने कार चालवत तीन ते चार वाहनांना धडक दिली. यात नऊ जण जखमी झाले आहेत. ही घटना पहाटे पाच वाजता घडली. कारच्या धडक दिलेल्या वाहनांची चक्काचूर झाला आहे.

Parbhani Somnath Suryavanshi Death Case : मंत्री सामंत अन् शिरसाट आज परभणी दौऱ्यावर, मयत सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेणार

परभणी हिसांचारानंतर ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला. याप्रकरणी सूर्यवंशी कुटुंबियांची काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भेट घेत महायुती सरकारवर गंभीर आरोप केले. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, राज्य सरकार देखील राहुल गांधींच्या आरोपांविरुद्ध आक्रमक झाले आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत आणि संजय शिरसाट आज परभणीतील सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेणार आहे.

Chhagan Bhujbal : नाराज छगन भुजबळ कुटुंबासह परदेश दौऱ्यावर जाणार

महायुती सरकारमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील ज्येष्ठ तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात डावलल्याने ते नाराज आहे. छगन भुजबळ यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री फडणवीसांकडून यातून मार्ग काढणार असल्याचे आश्वासन मिळाले. तसंच भुजबळांनी देखील आठ ते दहा दिवसांत भूमिका मांडणार असल्याचे सांगितले. आता छगन भुजबळ परिवारासह परदेश दौऱ्यावर जाणार असल्याचे समोर आले आहे. नाराज असताना छगन भुजबळ परदेश दौऱ्यावर जाणे आणि त्यानंतर भूमिका मांडणार, अशी भूमिका घेतल्याने छगन भुजबळांचा हा परदेश दौरा चर्चेत आला आहे. छगन भुजबळ यांना परदेश दौऱ्यासाठी परवानगी मिळाली आहे.

Suresh Dhas press conference : संतोष देशमुख यांच्या हत्येमधील मुख्य 'आका'ला लवकर अटक करा

भाजप आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावर सकाळी पत्रकार परिषद घेतली. हत्येमधील मुख्य आकाला लवकर अटक करण्याची त्यांनी मागणी केली. तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणीही घेतल्यास आनंद होईल, असेही आमदार धस यांनी म्हटले. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या चौकशीसाठी SIT स्थापन झाली आहे. आरोपींना 15 दिवसांची पोलिस कोठडी मिळाल्याचे समाधान आहे. पोलिस, सीआयडी, सर्वच आरोपींच्या मागावर आहेत. मोकोको अंतर्गत कारवाई होत आहे. हत्येतील मुख्य आका लवकरच अटक केली पाहिजे. हत्याप्रकरणात मुख्यमंत्री यांनी सभागृहात केलेले निवेदन अतिशय सकारात्मक आहे. एका दिवसात बीडच्या पोलिस अधीक्षकांची बदली झाली. आता बीड जिल्ह्यातील पोलिसांची प्रतिमा बदलली पाहिजे, अशी अपेक्षा आमदार धस यांनी व्यक्त केली.

Nashik Guardian Minister Appointment : भुसे अन् महाजन यांच्यात पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच

नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीमधील शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. शिवसेनेचे नेते मंत्री दादा भुसे यांनी गेल्या कामांचा दाखला देत, पालकमंत्रीपदावर दावा ठोकला आहे. तर भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मिळावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून वाद रंगला आहे.

Santosh Deshmukh Murder Case : माझ्या वडिलांना न्याय देण्यासाठी तुम्हा सर्वांची गरज; मयत देशमुख यांच्या मुलीची भावनिक साद

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे मयत सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, यासाठी मोर्चाच्या पूर्वतयारीची बैठक पार पाडली. महविकास आघाडीतील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते. मोर्चा 28 डिसेंबरला काढण्यात येणार आहे. या बैठकीत मयत संतोष देशमुख यांच्या पत्नी आणि मुलगी वैभवी हे देखील हजर होते. वैभवी देशमुख संवाद साधताना अतिशय भावनिक झाली होती. दरम्यान, 'तुमची मला गरज आहे, माझे काका एकटे नाही लढू शकणार, तुम्हा सगळ्यांच्या साथीची मला सध्या गरज आहे', अशी साद वैभवी संतोष देशमुख हिने घातली.

Allotment of halls in Ministry : मंत्र्यांना दालन, बंगले वाटपांची घाई; नूतनीकरणाची घाई

महायुती सरकारमधील मंत्र्यांना दोन दिवसात मुंबई मंत्रालयातील दालन आणि बंगले वाटप करण्यात आले. विश्वासात न घेता बंगले आणि दालन वाटप केल्याने काही मंत्री नाराज आहेत. बंगले, दालन वाटपाचे थेट आदेश आल्याने काही मंत्री गडबडून गेले आहेत. दरम्यान, महायुती सरकारच्या 42 मंत्र्यांपैकी 22 मंत्र्यांसाठी लागणारी नवीन दालने निर्माण करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.