मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला ‘लाडकी बहीण’ योजनेने चांगलीच साथ दिली होती. त्यामुळे पदभार घेताच सरकारने या योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी खूषखबर दिली असून डिसेंबर महिन्याचा हप्ता आजपासूनच (ता. २४ ) लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांत जमा होणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत ‘एक्स’च्या माध्यमातून माहिती दिली आहे.
महायुती सरकारने जुलै महिन्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना सुरू केली होती. या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या २१ ते ६५ वयोगटातील महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला प्रत्येकी दीड हजार रूपये जमा करण्यात येत आहेत. गेल्या पाच महिन्यांत राज्यातील कोटयवधी पात्र महिलांना आतापर्यंत साडेसात हजार रूपये मिळालेले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकदमच जमा केले होते. त्यानंतर ही रक्कम दीड हजार वरून २१०० रूपये करण्याचे आश्वासन महायुतीने जाहीरनाम्यात दिले आहे. त्यामुळेच महिलांनी महायुतीला भरभरून मतदान केले असल्याचे बोलले जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आला नव्हता. मात्र आता राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर या योजनेचे राहिलेले पैसे देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.