भारतीय संस्कृतीमध्ये चार युगांची संकल्पना मांडली आहे. त्यांपैकी द्वापारयुगाच्या अंती आणि कलियुगाच्या आरंभाआधी काही काळ भारताच्या सामाजिक आणि राजकीय पटलाव र जी स्थित्यंतरे घडली, त्याचे यथार्थ वर्णन महाभारतात आलेले आहे. मात्र, महाभारत म्हणजे केवळ कथांचा किंवा तत्कालीन घटनाक्रमांचा संग्रह नसून त्यातून शाश्वत नीतिमूल्यांच्या कालानुरूप आचरणाचे मार्गदर्शन करण्यात आले आहे.
महाभारतातील याच घटनाक्रमांचे, व्यक्तिरेखांचे आणि नीतिमूल्यांचे कालानुरूप आचरणाचे अनावरण करण्याचा प्रयत्न अमी गणात्रा यांनी त्यांच्या ‘महाभारताचे अनावरण : भारताच्या प्रसिद्ध इतिहासाचे अज्ञात पैलू’ या पुस्तकात केले आहे. मूळ इंग्रजीतील या पुस्तकाचा मराठी अनुवाद दीपाली पाटवदकर यांनी केला आहे. ब्लूम्सबरी प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
आपल्या गौरवशाली इतिहासाचे शब्दबद्ध चित्रण असलेल्या महाभारताचे युवा पिढीला त्यांच्या भाषेत आणि आजच्या संदर्भात आकलन व्हावे या हेतूने लेखिकेने या पुस्तकाचे लेखन केले आहे. मात्र, असे करत असताना महाभारताच्या मूळ संहितेशी कोठेही प्रतारणा होणार नाही आणि कपोलकल्पित आशयाची निर्मिती होणार नाही याची पुरेपूर काळजी या पुस्तकात घेण्यात आली आहे.
उलट अलीकडील काळात महाभारताबद्दल आणि त्यातील अनेक व्यक्तिरेखांबद्दल जे गैरसमज पसरले आहेत किंवा जे अनाठायी प्रश्न उपस्थित केले गेले आहेत ते सर्व गैरसमज दूर करण्याचा आणि अनाठायी प्रश्नांना समर्पक उत्तरे देण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे.
पुस्तकाच्या पहिल्या भागात विविध संदर्भ आणि महाभारताची पार्श्वभूमी त्याचप्रमाणे संक्षिप्त स्वरूपात महाभारत म्हणजे नेमक्या काय घटना झाल्या होत्या याची माहिती देण्यात आली आहे. दुसऱ्या भागात महाभारतातील व्यक्ती आणि घटनाक्रमांची माहिती देण्यात आली असून, या वाचत असताना महाभारतातील अनेक ऐकीव घटनांमागील सत्याचा उलगडा होतो त्याचप्रमाणे महाभारतातील अनेक व्यक्तिरेखांच्या स्वभावाबद्दलच्या कपोलकल्पित संकल्पनांनाही छेद जाऊन वास्तव काय आहे? हे समजायला मदत होते.
पुस्तकात प्राचीन भारतीय मूल्यांच्या आचरणाचा संदेश दडलेला असून तो समजावून घेणे हेच लेखिकेला अपेक्षित असल्याचे जाणवते. त्यामुळे नव्या वर्षाला सामोरे जात असताना, सरत्या वर्षांतील अनुभवांची शिदोरी अधिक समृद्ध करण्यासाठी युगसंधीची ही कथा आपल्याला नक्कीच प्रेरणा देईल.
(संकलन : रोहित वाळिंबे)