नवी दिल्ली :
अलिकडेच राजकारणात पाऊल ठेवलेले प्रसिद्ध शिक्षक अवध ओझा यांनी आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना देवाची उपमा दिली आहे. पटपडगंज येथील आप उमेदवार ओझा यांनी केजरीवालांना कृष्णाचा अवतार संबोधिले आहे. समाजातील कंस केजरीवालांच्या मागे लागले आहेत. कुणी गरीबांसाठी काम करू नये असे या दुष्टांचे मानणे आहे. केजरीवाल हे 2029 मध्ये पंतप्रधान होऊ नयेत म्हणून विरोधक त्यांच्या मागे लागल्याचा दावा ओझा यांनी केला आहे. जेव्हा एखादी व्यक्ती समाज बदलण्याचा प्रयत्न करते आणि जेव्हा कुणी गरीबांचा तारणहार होण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा दुष्ट लोक त्याच्या मागे लागतात. अशी स्थिती नसती तर भगवान कृष्ण यांचा जन्म कारागृहात झाला नसता. केजरीवाल हे दूरदर्शी असून त्यांच्यात देवाची लक्षणे आहेत. दिल्लीतील त्यांचे नेतृत्व पूर्ण देशासाठी लक्षवेधी ठरत आहे, असे उद्गार ओझा यांनी काढले आहेत.
हिंदूंच्या श्रद्धेची थट्टा : भाजप
भाजपने अवध ओझा यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत याला हिंदूंच्या श्रद्धेची थट्टा ठरविले आहे. आम आदमी पक्षाच्या नेत्याकडून भ्रष्ट केजरीवालांना श्री कृष्ण यांच्यासारखे ठरविणे अत्यंत अस्वीकारार्ह आहे. आम आदमी पक्ष हिंदूंच्या श्रद्धेची थट्टा करत असल्याची टीका भाजप नेत्या प्रीति अग्रवाल यांनी केली आहे.