नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पाच राज्यांच्या राज्यपालांच्या नियुक्त्या आणि बदल्या केल्याची घोषणा आज राष्ट्रपती भवनाच्या वतीने करण्यात आली.
माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह आणि माजी केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली असून ओडिशाचे राज्यपाल रघुवर दास यांचा राजीनामा राष्ट्रपती मुर्मू यांनी स्वीकारला आहे.
डॉ. हरी बाबू कांभमपती यांची ओडिशाच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. मिझोरामचे राज्यपाल म्हणून माजी केंद्रीय मंत्री जनरल व्ही.के. सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अजय भल्ला यांची मणिपूरचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांची बिहारच्या राज्यपालपदी तर बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची केरळच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.