राज्यात सर्वांत मोठी साखर कारखानदारी असलेला जिल्हा, केळी उत्पादनामध्ये जळगावला मागे टाकत घेतलेली आघाडी, गारमेंट उद्योगात सुरू असलेली झटपट वाटचाल, डाळिंब, द्राक्ष फळपिकांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगामध्ये सुरू असलेले नवनवीन प्रयोग, उजनी धरण, पंढरपूर, अक्कलकोट या तीर्थक्षेत्रांच्या माध्यमातून धार्मिक पर्यटन आणि धार्मिक अर्थकारणात सोलापूरचा असलेला ठसा, मालदांडी ज्वारी, फूड इंडस्ट्री अशा एक ना अनेक गोष्टी सोलापूरचा ब्रँड राज्यात गाजविणाऱ्या आहेत. हा ब्रँड आणखी चकाकत ठेवायचा असेल तर ‘वसा जनसेवेचा’ या तत्त्वावर राजकारण, समाजकारण, अर्थकारण अशा सर्व क्षेत्रांमध्ये आणखी जोमाने काम होण्याची आवश्यकता आहे.
गेल्या २०-२५ वर्षांपूर्वी स्थलांतरित आणि कामगारांचा जिल्हा, अशी ओळख असलेला सोलापूर जिल्हा आज चहूबाजूने प्रगती करतो आहे. येथील विविध ब्रँड्सनी राज्याची आणि देशाची बाजारपेठ काबीज केली आहे.
कृषी, गारमेंट आणि विविध उद्योग या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत आहे. सांस्कृतिक, आर्थिक, प्रशासकीय क्षेत्र, उद्योग, व्यवसाय अशा विविध क्षेत्रांमध्ये सोलापूरचे तरुण लौकिकाला साजेसे काम करत आहेत. या सर्वांमुळे सोलापूरचे नाव आज राज्यभर आदराने घेतले जात आहे.
साखर कारखानदारी
सोलापूर जिल्ह्याच्या अर्थकारणात साखर कारखानदारीची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. राज्यात सर्वाधिक ४३ साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून सोलापूरची ओळख निर्माण झाली आहे. साखर उद्योगात सोलापूर जिल्ह्यातील कारखानदार, शेतकऱ्यांनी स्वतःचा ब्रँड निर्माण केला आहे.
जिल्ह्यात दरवर्षी सुमारे ४५ ते ५० हजार लोकांना थेट रोजगार देणाऱ्या या उद्योगावर दीड लाख ऊसतोडणी मजुरांची रोजीरोटीही अवलंबून आहे. दरवर्षी सरासरी पाच ते सहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना उसाच्या एफआरपीपासून मिळतात. साखर उद्योगातील ९० टक्के रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या घरात जाते. साखर कारखानदारी हा एकमेव उद्योग असा आहे, की त्याचा लाभ स्थानिक कुटुंबांना होतो. त्यामुळे शेतकरी, मजूर, सामान्य माणूस यांना आर्थिक समृद्धी देणारा हा उद्योग आहे. यातूनच राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारीचा नावलौकिक निर्माण झाला आहे.
गारमेंट उद्योग
सोलापूरचा वैभवशाली उद्योग म्हणून गारमेंट उद्योगाची ओळख आहे. छोटछोट्या घटकांना थेट रोजगार देणाऱ्या गारमेंट उद्योगामुळे अनेकांच्या घरांमध्ये समृद्धी आली आहे. दुसरीकडे येथील गारमेंट उद्योगाने देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सोलापुरात तयार होणाऱ्या गणवेशाला देश- विदेशांतून खूप मोठी मागणी वाढली आहे. गुणवत्ता, पुरवठ्याचे नियोजन व रास्त दर यामुळे जागतिक पातळीवर सोलापूर नावारूपास आले आहे. आज सोलापुरात अनेक प्रकारचे गणवेश बनविले जात आहेत.
यामध्ये प्रामुख्याने शालेय, महाविद्यालयीन, एअरलाइन्स, औद्योगिक, हॉस्पिटल्स, कॉर्पोरेट्स, स्पोर्ट्स, फॅन्सी शर्ट आदी उत्पादनांचा समावेश आहे. सोलापूर शहरातील सुमारे १५ हजार कुटुंबे या उद्योगावर अवलंबून आहेत. शहरातील अनेक घराघरांत गारमेंट उत्पादनांची निर्मिती होत आहे. हजारो विडी कामगारांना या उद्योगामुळे हक्काचा रोजगार मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरातील गारमेंट उद्योगाचे कौतुक केले आहे.
स्मार्ट सिटी
२०१४ मध्ये मोदी सरकार पहिल्यांदा सत्तेत आल्यानंतर या सरकारने स्मार्ट सिटी योजनेची घोषणा केली. यामध्ये पहिल्या टप्प्यात देशातील दहा शहरांचा स्मार्ट सिटी योजनेमध्ये समावेश करण्यात आला होता. यात राज्यातील पुणे आणि सोलापूर या दोन शहरांचा समावेश होता. यावरून सोलापूरचे राजकीय आणि आर्थिक महत्त्व लक्षात येते.
स्मार्ट सिटी योजनेतून सोलापूर शहरात ९८३ कोटी रुपये खर्च करून ४७ विकासकामे करण्यात आली आहेत. यातील ४६ कामे पूर्ण झाली आहेत. तर समांतर जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात आहे. स्मार्ट सिटी ही सोलापूरचा चेहरामोहरा बदलणारी योजना ठरली आहे.
या योजनेतून पाणी वितरणासाठी स्काडा प्रणाली, घनकचरा व्यवस्थापन, हद्दवाढ भागात साडेतीन हजार पथदिवे, कमांड सिस्टिम, सोलार प्रकल्प, समांतर जलवाहिनी अशी विविध कामे करण्यात आली आहेत. या योजनेमुळे शहराच्या सौंदर्यात वाढ झाली आहे.
उजनी आणि इतर पाणी योजना
कायम दुष्काळी जिल्हा अशी ओळख असलेल्या सोलापूरमध्ये उजनी जलाशयामुळे अक्षरशः हरितक्रांती झाली झाली आहे. राज्यातील सर्वाधिक पाणीसाठवण (१२३.२८ टीएमसी) क्षमता असलेल्या उजनी धरणातून सुमारे दीड लाख हेक्टरहून अधिक शेतीला थेट पाणी मिळते. अप्रत्यक्ष लाभ मिळणारे क्षेत्रही मोठे आहे.
भविष्यात यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असून, विविध उपसा सिंचन योजनांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. तर सुमारे २० ते ३० लाख लोकसंख्या उजनीच्या पाण्यावर अवलंबून आहे. सोलापूर, पुणे आणि अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांतील शेकडो उद्योग उजनीच्या पाण्यावर अवलंबून आहेत; यावरून या धरणाचे महत्त्व लक्षात येते. उजनी धरण हा सोलापूरचा बँड आहे. सोलापूर जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्यात उजनी धरणाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
हरितक्रांती
उजनी धरण, आठ मध्यम प्रकल्प, नीरा डावा कालवा, सीना कोळेगाव प्रकल्प, कुकडी, टेंभू, म्हैसाळ आदी पाणी योजनांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात हरितक्रांती झाली आहे. ४२ साखर कारखाने, विविध फळप्रक्रिया उद्योग, ऊस, मका, गहू, कांदा, ज्वारी, डाळिंब, द्राक्ष, केळी, चिकू, पेरू, बोरे या पिकांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात हरितक्रांती झाली आहे.
ज्या जिल्ह्यात पूर्वी कायम दुष्काळी आणि स्थलांतर ही मोठी समस्या होती, त्या जिल्ह्यात आज दरवर्षी हजारो कोटींची उलाढाल होत आहे. साखर कारखानदारी, डाळिंब, बेदाणा, केळी हे सोलापूरचे ब्रँड सध्या राज्यातच नव्हे तर देशात गाजत आहेत, हे येथील मेहनती आणि कष्टाळू शेतकरी आणि पाण्यामुळे शक्य झाले आहे.
सोलापूर जिल्ह्याने आज फलोत्पादनामध्ये आघाडी घेतलेली आहे. येथील डाळिंब, द्राक्ष, केळी, पेरूला राज्यभर मागणी आहे. फळप्रकिया उद्योगालाही जिल्ह्यात चालना मिळत असून, सोलापूरच्या बेदाण्याला मोठी मागणी आहे. यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.
धार्मिक पर्यटन
देशाला सोलापूरची ओळख निर्माण करून देण्यात पंढरपूर, अक्कलकोट या तीर्थक्षेत्रांचे मोठे योगदान आहे. या तीर्थक्षेत्रांच्या भेटीसाठी दरवर्षी सुमारे एक कोटीहून अधिक लोक धार्मिक पर्यटनासाठी सोलापूर जिल्ह्यात येतात. या पर्यटकांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या अर्थकारणाला मोठा बूस्ट मिळत आहे. हजारो तरुणांना आणि कुटुंबांना धार्मिक पर्यटनामुळे रोजगार मिळाला आहे. पंढरपूर येथील आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री वारी या काळात राज्यभरातून तसेच परराज्यांतील भाविक पंढरपूरमध्ये येतात.
ते परत जाताना पंढरपुरातील किमान एक तरी वस्तू किंवा प्रासादिक साहित्य, खेळणी घेऊन जातात. या माध्यमातून पंढरपूरमध्ये दरवर्षी शेकडो कोटींची उलाढाल होते. गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः कोविडनंतर अक्कलकोट येथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. वीकेंड, शासकीय सुट्या, प्रत्येक गुरुवार, दत्तजयंती, गुरुपौर्णिमा या काळात श्री स्वामी समर्थ चरणी लाखो भाविक नतमस्तक होतात. या धार्मिक पर्यटकांमुळे अक्कलकोटच्या विकासाला मोठे बळ मिळत आहे.
होम स्टे, हॉटेल, नाश्ता सेंटर, ट्रॅव्हल्स या माध्यमातून शेकडो लोकांना रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. याशिवाय सोलापूर जिल्हा व परिसरातील सोलापूर शहरातील श्री सिद्धेश्वर देवस्थान, तुळजापूर, गाणगापूर, हत्तरसंग कुडल, करमाळा, बार्शी आदी ठिकाणीही भाविक मोठ्या प्रमाणात भेटी देतात.
निसर्ग पर्यटन
निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने सोलापूर जिल्ह्यातील अनेक स्थळांचा विकास होतो आहे. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी जलाशयातील विविध जातींचे शेकडो पक्षी सोलापूर जिल्ह्यासह राज्यात पक्षीप्रेमी आणि निसर्ग पर्यटकांना भुरळ घालतात. राज्यभरातील पक्षी अभ्यासक पक्षी निरीक्षणासाठी येथे येतात.
उजनी जलाशयाचे खास आकर्षण असलेल्या फ्लेमिंगो पक्ष्याला पर्यटक विशेष पसंती देतात. तसेच धरणातील पाणीपातळी कमी झाल्यानंतर धरणातील जुने वाडे, हेमाडपंती मंदिरे उघडी पडतात.
हा प्राचीन खजिना पाहण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील पर्यटक धरणावर येतात. कुरनूर धरण, आष्टी तलाव, राजापूर प्रकल्प, बेंद ओढा आदी ठिकाणी देखील विविध प्रकारचे पक्षी आढळतात. माळढोक अभयारण्यासाठी सोलापूर राज्यात प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात या अभयारण्याचे हिरवेगार रूपडे निसर्ग पर्यटकांना आकर्षित करते. तसेच नुकतीच या अभयारण्यात एक माळढोक असल्याची नोंद झाल्याने प्रक्षीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.