कलेचा आणि सेवेचाही 'धागा'
esakal December 26, 2024 10:45 AM

भारती पाटील

शिवणकाम करण्याचा छंद लहानपणापासून जडला. वेगवेगळ्या प्रकारचे कपडे शिवणे, आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्यांसाठी कमी बजेटमध्ये मनासारखे कपडे उपलब्ध करून देणे, परराज्यातील कपड्यांमधील कला सर्वदूर पोचविणे, अशा बाबींमधून आत्मिक समाधान मिळते आणि ज्या-त्या व्यक्तीच्या आवडी-निवडी जपण्याची संधीही मला माझ्या शिवणकामाच्या छंदातून मिळते.

माझे शिलाई करण्याचे युनिट आहे. मी ड्रेस, ब्लाउज, कुर्ती शिवते. लहानपणी कथ्थकचा ड्रेस पाहून तो कसा शिवला असेल असा मला प्रश्न पडला. तेव्हापासूनच शिवणकामाबाबत उत्सुकता तर होतीच, शिवाय ते करण्याबाबत आवडही निर्माण झाली. सुरुवातीच्या काळात मी कपड्यांचे एक्झिबिशन सणांच्या दिवसांमध्ये लावायचे. पैसे कमावणे हा त्यामागचा हेतू नव्हता, तर कमी बजेट असणाऱ्यांनाही व्हरायटी मिळावी आणि चांगली खरेदी करता यावी यासाठी एक्झिबिशन करायचे.

शिवाय आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्यांसाठी खास सवलतीत कपडे द्यायचे. त्यामुळे अनेकजणी माझ्याकडून कपडे शिवून घ्यायच्या. वेडिंग गाऊनही मी शिवून देते. त्याची किंमत बाजारातील किमतीच्या अर्ध्याहून कमी असते. त्यामुळे असा गाऊन शिवण्याची माझ्याकडे मागणी अधिक प्रमाणात आहे. त्यासाठी मी माझे छोटेसे युनिट तयार केले आहे. त्यात महिला वेगवेगळ्या पद्धतीचे शिवणकाम करतात.

आंध्र प्रदेशातील मच्छलीपट्टणम गावातील कलमकारी करणाऱ्या कारागिरांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यांच्याकडून माल घेऊन त्याची विक्री करण्याचे कामही मी करते. ही कलमकारी वनस्पतीच्या रंगापासून पेंट केली जाते. ती काॅटन, सिल्क सारख्या कापडावर केली जात असून तिचा लूकही क्लासी असतो. रास्त दरात या साड्या मी उपलब्ध करुन देते. त्यामुळे तिथल्या कारागिरांनाही त्यांच्या मालाला ग्राहक मिळतो.

शूटिंगमध्ये ब्रेक मिळाल्यास मी ड्रेसच्या विभागात जाते आणि तिथे माझे काम करते. शिवणे, ड्रेस कटिंग करणे, अशी कामे आवर्जून करते. आमच्या सेटवरील ड्रेसमनही काही वेळेस माझ्याकडून शिवण्याबाबतचे मार्गदर्शन घेतात. माझ्या छंदातून मला समाधान मिळते. तणाव दूर होण्यास मदत होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सेवा करण्याची संधी मिळते.

सोलर पॅनेल बसविण्यासाठीचा आग्रह

मी पर्यावरणाबाबतही जागृत आहे. त्यातून सौरऊर्जेच्या प्रसाराचेही काम मी करते. त्यामुळे सोलर पॅनेल बसविण्यासाठीही आग्रह धरते. त्यामुळे आपला खर्चही कमी होतो. पर्यावरणाच्या दृष्टीने ही सुविधा अतिशय चांगली आणि उपयुक्त आहे. साधारण तीनशे जणांनी सोलर पॅनेल बसविण्यासाठी त्यांना उद्युक्त करणार आहे. आत्तापर्यंत ७० जणांनी सोलर पॅनेल बसविले आहेत.

(शब्दांकन : तनिष्का डोंगरे)
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.