बीड : संसदेपासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनात गाजलेल्या मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या तसेच पवनचक्की खंडणी, ‘अॅट्रॉसिटी’ व पवनचक्कीवरील भांडणे या चारही प्रकरणांचा तपास आता गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आला आहे.
यापूर्वीच अपहरण, खून आणि ‘अॅट्रॉसिटी’ हे गुन्हे तपासासाठी ‘सीआयडी’कडे सोपविला होते. उर्वरित दोन गुन्हे पोलिस महासंचालकांच्या निर्देशाने या विभागाकडे वर्ग करण्यात आले.
दरम्यान, चार गुन्ह्यांत एकूण नऊ आरोपी आहेत. यातील चौघे कोठडीत असून पाच जण फरारी आहेत. अवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पाचे अधिकारी सुनील शिंदे यांच्या फिर्यादीवरून विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि वाल्मीक कराड यांच्यावर गुन्हा नोंद झाला.