ST Bus Accidents : 'लालपरी'च्या प्रवासी सुरक्षेला 'तडा' दोन वर्षांत आठ हजार ६४१ अपघात; एक हजार ६१ प्रवाशांचा मृत्यू
esakal December 26, 2024 10:45 AM

नागपूर : प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन धावणाऱ्या ‘लालपरी’ची प्रवासी सुरक्षा आणि विश्वसनीयता म्हणून ओळख आहे. मात्र, आता प्रवासी सुरक्षेलाच ‘तडे’ जाऊ लागले आहे. गेल्या दोन वर्षांत महामंडळात तब्बल आठ हजार ६४१ अपघात झाले असून, त्यात एक हजार ६१ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागल्याचे माहिती अधिकाराअंतर्गत घेतलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्राची ‘जीवनवाहिनी’ म्हणून लालपरीची ओळख आहे. गोंदिया, गडचिरोलीच्या दुर्गम भागापासून तर मुंबई, पुणे आणि कोकणापर्यंतच्या गावखेड्यात राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)ची बस धावते. ग्रामीण भागात आजही प्रवासी वाहतुकीचे साधन म्हणून एसटीलाच पसंती आहे. सरकारकडून अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना आदी सवलती मिळत असल्याने प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. प्रशिक्षित चालक असल्याने सर्वसामान्य प्रवाशांचा एसटीवर विश्वास कायम आहे. गेल्या दोन वर्षांत वाढत्या अपघातांच्या घटनांनी या विश्वासाला तडे जाऊ लागले आहे.

गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा-खजरी लगतच्या वृंदावन टोला फाट्याजवळ २९ नोव्हेंबर रोजी शिवशाही बस उलटली होती. या भीषण अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला तर २९ जण जखमी झाले. या भीषण घटनेसह एसटीच्या अनेक किरकोळ व मोठ्या घटना घडल्या आहेत. जुन्या बसगाड्या रस्त्यात बंद पडणे, स्टिअरिंग अचानक लॉक होणे आदी प्रकार सुद्धा वाढले आहे. त्यामुळेही अपघातात वाढ होत असल्याचे पुढे आले आहे.

एक लाख ७२ हजार वेळा ‘ब्रेक डाऊन’

१ जानेवारी २०२२ ते ३१ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत एकूण १ लाख ७२ हजार ४५७ वेळा एसटी महामंडळाच्या बस मार्गावर ‘ब्रेक डाऊन’ झाले. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. यादरम्यान ४९ हजार १६९ लाख प्रवाशांनी प्रवास केल्याचे अभय कोलारकर यांना माहिती अधिकार कायद्यांतर्गत ही माहिती मिळाली.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.