Pune: वाहतूक कोंडीने तुंबले पुणे शहराचे रस्ते
esakal December 26, 2024 12:45 PM

Pune Latest News: नाताळाचा उत्सव साजरा करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याने शहराच्या मध्यभागासह कॅम्प परिसरात बुधवारी रात्री मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

गर्दीचा परिमाण म्हणून लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, नदीपात्रातील रस्ता, जंगली महाराज रस्ता, गणेशखिंड रस्ता या मार्गांवर मोठ्या प्रमाणात कोंडी झाली आहे. तर कॅम्पमध्ये महात्मा गांधी रस्ता आणि परिसरात असलेले अंतर्गत रस्ते देखील जाम झाले होते.

कोंडी सुरळीत करण्यासाठी कॅम्प परिसरात चौकाचौकात वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले होते. मात्र शहराच्या मध्य भागात वाहतूक पोलिसांची संख्या कमी होती. त्यामुळे मध्यभागातून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी कोंडीचा सामना करावा लागला.

नाताळ साजरे करण्यासाठी बुधवारी रात्री दहानंतर अनेक नागरिक घराबाहेर पडले होते. त्यामुळे शहरातील अनेक मार्गावर अचानक कोंडी झाली होती. यामध्ये शहराच्या मध्यभागातून कॅम्पकडे जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक होती.

लेनची शिस्त न पाळणे, एकेरी मार्गावर उलट्या दिशेने वाहन नेणे, सिग्नल न पाळणे, दुतर्फा अशा प्रकारच्या वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने कोंडीत भर पडत होती.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.