सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षा यंदा पहिल्यांदाच ऑनलाइन घेतली. त्यानंतर त्याचा निकालही ऑनलाइन जाहीर करून प्रवेश प्रक्रिया, परीक्षेचे अर्जही ऑनलाइनच भरून घेण्यात आले. विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया पूर्णत: ऑनलाइन करण्यात आली आहे. त्यासाठी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी २००४ ते २०२४ या काळातील संपूर्ण डेटा आता एकाच स्वॉफ्टवेअरमध्ये घेतला असून, त्यातून विद्यार्थ्यांना आता सर्व सुविधा ऑनलाइन मिळणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या सत्र परीक्षेपूर्वी संबंधित परीक्षा केंद्रांना त्या ठिकाणी किती विद्यार्थी असतील, याची माहिती ऑनलाइन मिळते. त्यातून बैठक व्यवस्थेच्या नियोजनातील अडचणी दूर झाल्या आहेत. परीक्षेनंतर जवळपास ६० टक्के व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका ऑनलाइन तपासून त्यांचे निकालही ऑनलाइन लावले जात आहेत.
आगामी वर्षात १०० टक्के अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका ऑनलाइन तपासल्या जातील. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देखील ऑनलाइनच मिळत आहे. काही वर्षांपूर्वी परीक्षेचे अर्ज भरायचे असो की प्रवेशाचे अर्ज, त्यासाठी विद्यापीठात, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत होते. पण, आता ऑनलाइन प्रक्रियांमुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या अर्ज भरता येत आहेत. पीएच.डी.ची एन्ट्रन्स देखील यंदा पहिल्यांदाच ऑनलाइन पार पडल्याचे पाहायला मिळाले.
विद्यार्थ्यांचे हेलपाटे कायमचे थांबणार
कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र- कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या पुढाकारातून विद्यापीठाचा २००४ पासूनचा डेटा आता एकाच स्वॉफ्टवेअरमध्ये घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याही कामासाठी विद्यापीठात यायची गरज भासणार नाही. त्यांचा वेळ वाया जाऊ नये, त्यांना हेलपाटे मारायला लागू नयेत, त्यांची कामे वेळेत व्हावीत या हेतूने बहुतेक प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आल्या आहेत.
- डॉ. श्रीकांत अंधारे, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र सुविधा केंद्र
विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची अडचण तथा प्रश्न ऑनलाइन सुटावेत या हेतूने विद्यापीठात स्वतंत्रपणे विद्यार्थी सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी, पदवी प्रमाणपत्र, मायग्रेशन (स्थलांतर) सर्टिफिकेट अशा सर्व सुविधा ऑनलाइन उपलब्ध आहेत. त्यासाठी विद्यापीठात हेलपाटे मारायची गरज भासणार नाही अशी ही व्यवस्था उभारण्यात आली आहे.