Kalyan Water: कल्याण-डोंबिवलीचा पाणीपुरवठा एक दिवस बंद
esakal December 26, 2024 12:45 PM

Dombivali: कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शहर आणि ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या उल्हास नदीकाठच्या जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल आणि दुरुस्तीची कामे करायची आहेत.

या कामासाठी कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शहरांना होणारा पाणीपुरवठा २ जानेवारीला सकाळी सहा ते रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घातला आहे.

कल्याण, डोंबिवली, टिटवाळा आणि लगतच्या ग्रामीण भागाला पालिकेच्या बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. या चारही जलशुद्धीकरण केंद्रांमधील विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम करणे आणि शहराच्या विविध भागांतील प्रभाग हद्दीतील पाणीपुरवठा जलवाहिन्या अनेक ठिकाणी गळत आहेत.

या गळक्या जलवाहिन्यांमुळे त्या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. या सर्व समस्यांचा विचार करून पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून विविध भागात पाणीपुरवठा वितरण करणाऱ्या गळक्या जलवाहिन्यांची दुरुस्ती केली जाणार आहे, असे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे यांनी सांगितले.

कमी दाबाने पुरवठा


कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली पूर्व, पश्चिम, टिटवाळा, मांडा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी भागावर पाणीपुरवठा बंदचा परिणाम होणार आहे. दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणीसाठा घरगुती वापरासाठी करून ठेवावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.