India vs Australia Boxing Day Test: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २०२४-२५ या कसोटी मालिकेतील चौथा सामना गुरुवारी (२६ डिसेंबर) सुरू झाला आहे. हा बॉक्सिंग डे कसोटी असल्याने मेलबर्नला होत आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाने या मालिकेत पहिल्यांदाच नाणेफेक जिंकली आहे. याआधीच्या तिन्ही सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली होती.
या सामन्यासाठी दोन्ही संघात बदल झाले आहेत. या सामन्यासाठी भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल केला असून वॉशिंग्टन सुंदर पुनरागमन करत आहे. त्याला शुभमन गिलच्या जागेवर संधी देण्यात आली आहे.
त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा पुन्हा वरच्या फळीत खेळताना दिसणार असल्याचे त्याचे नाणेफेकीवेळी स्पष्ट केले आहे. त्यामुळे तो सलामीला किंवा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरू शकतो.
ऑस्ट्रेलियाने नॅथन मॅकस्विनीच्या जागेवर सॅम कोन्टासला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. कोन्टास या सामन्यातून पदार्पणही करेल. त्याशिवाय दुखापतग्रस्त जोश हेजलवूडच्या जागेवर स्कॉट बोलंडला ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.
असे आहेत प्लेइंग इलेव्हन -भारत - यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत (ऋषभ पंत), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप
ऑस्ट्रेलिया - उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, अलेक्स केरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नेथन लायन, स्टॉट बोलंड
या मालिकेत सध्या पहिल्या तीन सामन्यांनंतर १-१ अशी बरोबरी आहे. त्यामुळे हा सामना मालिकेच्या निकालाच्या दृष्टीनेही महत्वाचा ठरणार आहे.
मेलबर्न कसोटीत विजय मिळवणारा संघ मालिकेतील पराभव टाळून सिडनीमध्ये होणाऱ्या पाचव्या कसोटीत मालिका विजयासाठी प्रयत्न करताना दिसेल. तसेच जर मेलबर्न कसोटी अनिर्णित राहिली, तर सिडनी कसोटी निर्णायक ठरेल.