Maharashtra Weather Update: ऐन हिवाळ्यात थंडी गायब, राज्यातील 'या' भागांत गारपीट, पावसाचा इशारा
esakal December 26, 2024 03:45 PM

पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात उत्तर तमिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने राज्यात पावसाला पोषक वातावरण झाले आहे. त्यामुळे थंडी गायब झाली. आज राज्यातील उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच उद्या राज्यातील अनेक भागांत पावसाचा तसेच गारपीटीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

27 डिसेंबरला दुपारपासून मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात सर्वात प्रथम नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यांसह, दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील पूर्व भागांमध्ये होईल. शुक्रवार रात्रीपर्यंत वादळी पाऊस पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यात हजेरी लावेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

वादळी पाऊस 28 डिसेंबरच्या पहाटेपर्यंत पूर्वेकडे सरकेल आणि विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, आणि चंद्रपूर जिल्ह्यांत हजेरी लावेल. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे. पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची स्थिती या दिवशी देखील कायम राहू शकते.

देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमी - अधिक होत आहे. बुधवारी (ता. 25) पंजाबच्या आदमपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी 4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात ढगाळ हवामान झाले असून, गारठा कमी होत उकाडा वाढला आहे. बुधवारी (ता. 25) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे नीचांकी 13.4 अंश तापमान नोंदले गेले.

दरम्यान शेतकऱ्यांनी या पुढील कृषी सल्ला आणि हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवावे आणि त्यानुसार नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.