Manoj Jarange Patil: बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसापूर्वी अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. अशात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मयत संतोष देशमुख यांच्या परिवाराची सांत्वन भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी 28 रोजी आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी त्यांनी जनतेला आवाहन केले. मराठा आरक्षणासह विविध मागण्याबाबात मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा देखील दिला.
मस्साजोग गावात गावकऱ्यांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, येत्या 28 तारखेला आयोजीत आंदोलनात संतोष देशमुख यांच्या मुलच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपण सर्वांनी सहभागी झाले पाहिजे. सर्वांनी जातीपातीच्या पलिकडे जाऊन एकत्र यायचे आहे. एका लेकीनं हाक मारली आहे तो शब्द तोडायचा नाही. हत्येच्या या घटनेमुळे आज संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आज गावातील प्रत्येक माणूस म्हणत आहे की, संतोष देशमुख यांना न्याय मिळायला हवा. मग आता समोर कोन अन् मागे कोन याचा विचार न करता संतोष देशमुख यांच्या न्याय हक्कासाठी जात आहोत हे लक्षात ठेवा. आपण मान पान न पाहता लेकीनं हाक मारली आहे, सर्वांनी 28 तारखेला मोर्चात सहभागी होण्यासाठी एकत्र या, असे आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित गावकऱ्यांना केले.