छत्रपती संभाजीनगर : सरकारी अधिकारी, कर्मचारी म्हटले की कामाची टाळाटाळ, कार्यालयात सर्वसामान्यांना भेटताना चेहऱ्यावर त्रागा अशीच काहीशी प्रतिमा सर्वसामान्यांच्या मनात आहे. परंतु, सगळेच कर्मचारी असे नाहीत. येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील स्थलांतरित विद्यार्थ्यांच्या शोधासाठी बुधवारी थेट कुक रमुंडा (गुजरात) आणि तळोदा (नंदुरबार) गाठले.
या पथकाने तिथे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुलांच्या पालकांची भेट घेतली. त्यांचे समुपदेशन केल्यानंतर २५ मुलांना घेऊन जिल्ह्याकडे मोर्चा वळवला. इतर मुले पहिल्या-दुसऱ्या वर्गात असल्याने त्यांना शिक्षण हमी कार्ड दिले जाणार आहे.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार प्रत्येक बालकास गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी देण्यात आली. दिवाळीनंतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांसह पालकांचे ऊसतोड, वीटभट्टी, बांधकाम व अन्य हंगामी कामासाठी स्थलांतर झाले.
त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली. आता स्थलांतरित विद्यार्थ्यांची शोधमोहीम शिक्षण विभागाने सुरू केली. त्यासाठी बालरक्षक पथक स्थापन केले. हे पथक परजिल्ह्यातच नाही तर परराज्यात शोधमोहीम राबवत आहे.
बुधवारी नाताळाची सुटी असताना शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, उपशिक्षणाधिकारी नीता श्रीश्रीमाळ, गीता तांदळे, शिक्षण विस्ताराधिकारी संगीता सावळे, मुख्याध्यापक राजपूत, कल्याण पवार, किशोर आगळे, ज्ञानेश्वर वाघ यांचा समावेश असलेल्या पथकाने गुजरातमधील कुकरमुंडा गाठले. यावेळी त्यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २५ विद्यार्थी आढळून आले. या विद्यार्थ्यांची हमी आम्ही घेऊ, असे आश्वासन पालकांना या पथकाने दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन हे पथक आता परतीच्या प्रवासाला निघाले आहे.
पाच हंगामी वसतिगृहेविद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी शिक्षण विभागाचे बालरक्षक गावोगावी जनजागृती मेळावे घेऊन स्थलांतर रोखत आहेत. आतापर्यंत ५०० हून अधिक विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखण्यात आले आहे. स्थलांतर रोखलेल्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात ५ ठिकाणी हंगामी वसतिगृहे स्थापन करण्यात आली. तिथे या मुलांना नाश्ता, जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली.
बुधवारी आम्ही गुजरातला रवाना झालो. तेथे आम्हाला जिल्ह्यातील २५ हून अधिक विद्यार्थी आढळून आले. पालकांच्या अडचणी समजून घेतल्या. मुलांना शाळेत पाठवण्याची विनंती केली. पालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे २५ विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात यश आले. मात्र, जी मुले पहिलीला होती ती लहान असल्याने त्यांना आणले नाही. त्या मुलांना शिक्षण हमी कार्ड देणार आहोत. शोधमोहीम सुरूच राहणार आहे.
— जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग