ढिंग टांग : एक रहेंगे, सेफ रहेंगे..!
esakal December 27, 2024 10:45 AM

ढिंग टांग

सदू : (फोन फिरवत) म्यांव म्यांव…म्यांव म्यांव!

दादू : (परवलीचा शब्द ऐकून) बोल सदूराया..!

सदू : (सदिच्छेने) तुम्हा सर्वांना नाताळच्या शुभेच्छा!

दादू : (प्रेमाने) तुलाही!! कोरड्या शुभेच्छा का देतोस? केक पाठवला असतास तर?

सदू : (सावध होत) …संपला!!

दादू : (अधिक प्रेमानं) काही हरकत नाही, सदूराया! पुढल्या वेळेला दोन पाठव!!

सदू : (खुशीत) बरं झालं, परवा लग्नाच्या मांडवात भेटलास! बरं वाटलं!!

दादू : मलाही!! कसाही असलास तरी माझा भाऊ आहेस तू!!

सदू : (सहज चौकशी केल्यागत) क्यूं…सध्या क्या चल रहा है!

दादू : (किंचित नाराजीनं) फॉग चल रहा है! काहीही चालू नाही! सगळं बंद पडलंय!!

सदू : (आणखी चौकशी करत) सध्या वेळ कसा घालवतोस?

दादू : कधी पाचतीनदोन खेळतो! कुणीच नसेल तर पेशन्सचा डाव लावतो!! ढकलायचा वेळ कसाबसा!! तुझं काय चाललंय?

सदू : (निर्विकारपणे) तेच!!

दादू : (अस्वस्थपणाने) काहीतरी केलं पाहिजे! असं गप्प बसणं शोभत नाही आपल्या आडनावाला!!

सदू : (धोरणीपणानं) महापालिका निवडणुका येताहेत, तोवर कळ काढायला हवी, दादूराया!

दादू : (फुशारकी मारत) मी तर आमच्या पक्षाच्या मीटिंगा सुरुदेखील केल्या! उद्यापासून तीन दिवस सगळ्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतोय!

सदू : (च्याट पडत) डायरेक्ट मेळावा? कुठे? शिवाजी पार्कला की षण्मुखानंद हॉलमध्ये?

दादू : (वेड्यात काढत) छे रे…घरीच बोलावलंय! आता कुठलं शिवाजी पार्क? घरातल्या दिवाणखान्यात मावतील, एवढेच तर पदाधिकारी उरलेत!!

सदू : (आसुरी आनंदानं) मीही तेच करतो! घरातल्या घरातच मीटिंगा घेतो! पण तुम्ही मला मित्रमंडळ म्हणून चिडवता!!

दादू : (पश्चात्तापानं) सदूराया, मी तुला आजवर जे जे काही बोललो, ते मनावर घेऊ नकोस हं! उगाच टोचून बोललो तुला मी! सॉरी!!

सदू : (दुखावलेल्या सुरात) किती टोमणे मारतोस रे! बरं झालं, महाराष्ट्राच्या मतदारांनी तुझा टोमण्यांचा तोफखाना बंद पाडला!! सगळे हैराण झाले होते…

दादू : (खंतावून) मी ज्यांना ज्यांना टोमणे मारले, त्यांचं कल्याण झालं!!

सदू : (स्वप्नाळूपणाने) माझंही भलं होऊ दे! मला किती टोमणे मारत होतास…

दादू : (धीर देत) होईल, होईल!! वाट बघ!!

सदू : (गाडी मुद्द्यावर आणत) महापालिका निवडणुकीसाठी काय रणनीती आहे तुझी?

दादू : (चतुराईने) आधी तुझी सांग!

सदू : (गंभीर होत) कमळाबाईच्या कडेवर बसायचं की तिच्या कंबरड्यात लाथ घालायची, याचा निर्णय होत नाहीए!

दादू : (दातओठ खात) मी लाथ घालणारच आहे, तू तेव्हा नेमका तिच्या कडेवर बसला असशील तर तोंडघशी पडशील!

सदू : (चिंताग्रस्त सुरात) पण तुमच्या पक्षाची प्रकृती अशी तोळामासा! कसं जमायचं?

दादू : (संतापातिरेकाने) सदूराया, ऐक, आता तरी त्या कमळेचा नाद सोड! माझी अवस्था काय झालीये, ते बघतो आहेस ना? जो तिच्या नादाला लागला, तो संपला!!

सदू : (थंडपणाने) कमळाबाईच्या संगतीत होतास, तोवर तुझं भलं झालं! तिला सोडल्यावर तुझे ग्रह फिरले!!

दादू : (निकरावर येऊन) महापालिकेत मला अपशकून करु नकोस, म्हंजे मिळवली!! तुझा काही भरवसा नाही!!

सदू : (सुप्रसिद्ध खर्जात) तुझा तर अजिबातच भरवसा उरला नाही!!

दादू : (समन्वयाच्या सुरात) बाबा रे, रात्र वैऱ्याची आहे! एक रहेंगे, तो सेफ रहेंगे! दे टाळी!!

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.