कर्जाची परतफेड करण्यासाठीही परकीय चलन नव्हतं, मनमोहन सिंह यांचा एक निर्णय अन् चित्र बदललं
Marathi December 27, 2024 11:24 AM

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंह यांचं 26 डिसेंबरला निधन झालं. त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 1991 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचं वर्ष मानलं जातं. त्यावेळी भारत आर्थिक संकटात सापडला होता. डॉ.मनमोहन सिंह त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव  यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते. डॉ. मनमोहन सिंह यांनी त्यावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडील 44 टन सोनं गहाण ठेवण्याचा निर्णय घेत इतिहास रचला.

भारताकडे 1991 मध्ये परकीय चलन 1.2 अब्ज डॉलर्स इतकं राहिलं होतं. ते फक्त पुढील तीन आठवडे पुरेल इतकं होतं. आखाती देशातील युद्धामुळं कच्च्या तेलाच्या दरांमध्ये वाढ झाली होती. ज्यामुळं भारतावर आयातीसाठी दबाव वाढला होता. त्याशिवाय भारतानं विदेशी आंतरराष्ट्रीय संस्थांकडून कर्ज घेतलं होतं, ते परत करण्यासही भारताकडे परकीय चलन राहिलं नव्हतं.

1980 मधील आर्थिक धोरणांमुळं भारताला कर्ज आणि राजकोषीय तुटीमध्ये ढकललं होतं. डॉ. मनमोहन सिंह यांनी अर्थमंत्री म्हणून भारताकडील  67 टन सोनं आंतरराष्ट्रीय बाजारात गहाण ठेवलं. हे सोनं स्वित्झरलँड आणि इंग्लंडच्या बँक ऑफ इंग्लंडकडे पाठवण्यात आलं.

सोनं गहाण ठेवल्यानं भारताला जवळपास 600 मिलियन डॉलरचं कर्ज मिळालं. यातून विदेशी संस्थांच्या कर्जाची परतफेड आणि आयातीमध्ये सातत्य ठेवलं गेलं. सोनं गहाण ठेवल्यानं त्यावेळी टीका देखील झाली. भारतात आर्थिक समृद्धी आणि सांस्कृतिक प्रतीक म्हणून सोनं मानलं जातं. त्यावेळी राजकीय नेत्यांकडून आणि जनतेकडून टीका मनमोहन सिंह यांना सहन करावी लागली. मात्र, त्यांच्या याच निर्णयानं भारतीय अर्थव्यवस्थेला स्थिर केलं.

सोनं गहाण ठेवल्यानंतर  डॉ. मनमोहन सिंह यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी काम करण्यास सुरुवात केली. 1991 मध्ये उदारीकरणाला सुरुवात करण्यात आली. त्यामुळं भारतीय बाजार जागतिक गुंतवणुकीसाठी खुला झाला. सिंह यांनी लायसन्स राज संपवलं. विदेशी कंपन्यांना भारतीय बाजारात प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आली. आयात-निर्यातीचे नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली. ज्यांनतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये तेजी पाहायला मिळाली.  भारतीय अर्थव्यवस्थेकडे एक वेगानं विकसित होारी जागतिक शक्ती म्हणून पाहिलं जाऊ लागलं.

डॉ.मनमोहन सिंह यांचं योगदान पाहता त्यांना भारतातील आर्थिक सुधारणांचे जनक म्हणून पाहिलं जातं. सोनं गहाण ठेवणं भारताच्या इतिहासातील महत्त्वाचा क्षण होता. मनमोहन सिंह यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला कोसळण्यापासून वाचवलं.डॉ. मनमोहन सिंह यांच्या एका निर्णयामुळं भारत आज मजबूत आणि स्थिर अर्थव्यवस्था असणारा देश बनला आहे.

इतर बातम्या :

जे कोणाला जमलं नाही, ते मनमोहन सिंगांनी करुन दाखवलं, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर 9 टक्क्यांवर नेला

अधिक पाहा..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.