डॉ. मालविका तांबे
हिवाळा हा आयुर्वेदाच्या मताने आरोग्याकरिता सर्वांत प्रशस्त काळ असतो. या काळात बाहेर गारवा असल्यामुळे शरीरातील अग्नी प्रदीप्त असतो, त्यामुळे या काळात शरीराला दिलेल्या प्रत्येक मदतीचा उपयोग करून घेता येऊ शकतो. या वाढलेल्या अग्नीचा व्यवस्थित उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने कदाचित या काळात वेगवेगळे सणवार साजरे केले जातात.
आहारहिवाळ्यात गरम पाणी पिणे इष्ट. स्नान, भांडी धुणे, कपडे धुणे वगैरे जेथे जेथे पाण्याचा वापर केला जातो, तेथेही गरम पाणी वापरणे उत्तम.
वेगवेगळी गरम सूप, रसम, सांबार वगैरे पदार्थ खाण्यात ठेवावे.
या काळात शक्य असल्यास दशमूळांचा काढा आठवड्यातून १-२ वेळा घेणे, आले-मिरी-गवती चहा-दालचिनी घालून केलेला हर्बल टी घेणे उत्तम.
शक्य झाल्यास सॅन अमृतपासून अथवा फॉर्म्युला के २ बनविलेला काढा अधून मधून घ्यायला हरकत नाही.
अर्धा कप पाण्यात दोन चमचे गाईचे साजूक तूप व एक चिमूट सैंधव घालून सकाळी घेतल्याने शरीरातील कोरडेपणा कमी व्हायला मदत होते. हेच मिश्रण रात्री घेतल्याने पोट साफ व्हायला व आतड्यांमध्ये ओलावा यायला मदत होते.
दिवसातून एकदा तरी मुगाची डाळ, तांदूळ, तीळ वगैरे घालून केलेली गरम गरम पातळ खिचडी भरपूर तूप घालून घेणे उत्तम.
सूप करत असताना तिखटाऐवजी काळी मिरी व पिंपळीचा वापर करणे अधिक चांगले.
एकंदरीत या काळात शरीरधातूंची ताकद व शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची रसायने (टॉनिक) आयुर्वेदाने घ्यायला सांगितले आहे. उदा. खजूर-तूप, लोणी-खडीसाखर, डिंकाचे लाडू, खवा पोळी, उडीद पाक, सारखे धातुपोषक पदार्थ घरी करून खाणे किंवा तयार मॅरोसॅन घेणे उत्तम.
संतुलन अमृतशर्करायुक्त पंचामृत घेणे धातुपोषणासाठी व शुक्रपोषणासठी अत्यंत उत्तम.
बदाम, काजू, अंजीर, काळ्या मनुका, केशर, आवळा, अश्वगंधा, कवच बीज, गोडांबी, अर्जुन, सुवर्ण व रजत धातू या काळात रसायनासारखे वापरावे असे सांगितलेले आहे.
याच आधारावर या काळात च्यवनप्राशसारखे रसायन नियमित घ्यावे असे सांगितलेले आहे. त्यामुळे हिवाळ्याच्या काळात ३-४ महिने संतुलन च्यवनप्राश, आत्मप्राश, संतुलन धात्री रसायन, सॅन रोझ, मॅरोसॅन वगैरेंसारखी रसायने घेणे उत्तम. अशा प्रकारच्या रसायनांनी शरीरात धातुशक्ती, शुक्रशक्ती, वीर्यशक्ती वाढते, रोगप्रतिकारक्षमता वाढते, हृदय, मेंदू, फुप्फुसे वगैरे महत्त्वाच्या अवयवांना ताकद मिळते, डोळे, नाक, कान, त्वचा या इंद्रियांची ताकद वाढते, बुद्धी, मेधा, प्रज्ञा वाढते, त्वचेची कांती सुधारते.
सध्या बऱ्याच व्यक्ती वेगवेगळे डाएट प्लॅन अनुसरतात. पण थंडीच्या ऋतूत सुपाच्य व पोषक अन्न शरीराला दिले नाही तर शरीरात वात वाढण्याची शक्यता असते. बऱ्याचदा असे बघण्यात येते की असे डाएट प्लॅन अनुसरल्यामुळे थायरॉइड, मधुमेह, मज्जासंस्थेचे विकार वगैरे चयापचय संबंधित आजार पाहायला मिळतात.
अभ्यंग
हिवाळ्याच्या काळात संपूर्ण शरीराला व डोक्यालाही वनस्पतींनी सिद्ध केलेले तेल नियमित लावावे, असे सांगितलेले आहे. नियमित अभ्यंग केल्याने वातदोष नियंत्रित करायला मदत मिळते, झोप शांत लागते, मज्जाधातूला पोषण मिळते, रोगप्रतिकारशक्ती वाढते, म्हातारपण उशिरा येते, सर्व इंद्रियांची ताकद वाढते, शरीराचा बांधा व्यवस्थित राहायला मदत मिळते, मांसधातूची ताकद वाढते, शरीराची लवचिकता वाढते, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्वचा स्निग्ध व तेजस्वी राहते. अभ्यंगासाठी संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेलसाराके तेल वापरता येते.
अभ्यंगानंतर पादाघात अर्थात पायांनी संपूर्ण शरीराचा मसाज करणे हेही तज्ज्ञ थेरपिस्टकडून करून घेणे चांगले.
स्नानापूर्वी शरीराला वनस्पतींच्या चूर्णांनी उद्वर्तन करणे चांगले. तसेच वनस्पतींपासून तयार केलेले सॅन मसाज पावरडरसारखे उटणे स्नानाच्या वेळी वापरावे.
थंडीच्या दिवसांत वापरात येणारे कपडे नैसर्गिक तंतूंपासून बनविलेले असावे. उदा. रेशमी, सुती वा लोकरीपासून बनविलेले कपडे घालणे इष्ट. चादर व पांघरूण सुद्धा अशाच प्रकारच्या तंतूंपासून बनविलेले असणे उत्तम.
थंडीच्या दिवसांमध्ये पायांमध्ये सतत चपला, आवश्यक असल्यास मोजे घालावे.
हिवाळ्याच्या दिवसांतील उपचारांमध्ये स्वेदन महत्त्वाचे असते. स्वेदनामुळे शरीरात साठलेला कफ बाहेर निघून जातो, त्यामुळे सर्दी-खोकला-ताप वगैरे आजार होण्याची शक्यता कमी होते.
स्वेदनासाठी थंडीच्या काळात शेकोटीभोवती बसणे उत्तम. रात्रीच्या वेळी शेकोटीभोवती गप्पा मारत बसता येते, याच शेकोटीत बटाटा, रताळे, मका वगैरे भाजून खाण्याचा आनंद घेता येतो.
सध्याच्या काळात लग्नाप्रसंगी लॉन्समध्ये अशा प्रकारची शेकोटी पेटविलेली दिसते. प्रसंगाला येणारे पाहुणे हमखास शेकोटीच्या आसपास खुर्च्या टाकून बसलेले दिसतात.
शेकोटी पेटवणे शक्य नसल्यास घरच्या घरी गरम पाण्याची पिशवी, गरम वीट किंवा काळजीपूर्वक गरम तव्याने सुद्धा शेक घेण्याची पद्धत आपल्याकडे होती.
जमत असल्यास वैद्यांच्या सल्ल्याने स्वेदनपेटिकेमध्ये स्वेदन करून घेणे किंवा स्वतःच्या प्रकृतीनुसार सौना करवून घेणेही उत्तम ठरते.
स्वेदन केल्यामुळे शरीरातील वात व कफदोषाचे शमन होते, जेवणात रुची वाढते, शरीराची स्रोतसे शुद्ध होतात, शरीराला हलकेपणा प्रतीत होतो, शरीराचा मेदधातू कमी व्हायला मदत मिळते, सांध्यांची लवचिकता वाढते.
या काळात अनेकांचा सांधेदुखीचा त्रास वाढलेला दिसतो. संतुलन शांती सिद्ध तेलासारखे एखादे तेल साध्यांना लावून नंतर निर्गुडीच्या पाल्याने किंवा दशमुळांनी सांध्यांचे स्वेदन केल्यास आराम मिळतो.
घरात लहान मुले असल्यास जमिनीवर कार्पेट घातलेले असणे उत्तम. थंडीपासून बचाव करण्याच्या दृष्टीने घरात ऊब राहण्यासाठी हीटर्सचाही उपयोग करता येतो.
एकूणच हिवाळ्यात अशा प्रकारे आहार, विहार व उपचारांची काळजी घेतल्यास स्वास्थ्य व्यवस्थित राहायला मदत करता येऊ शकते.