मनमोहन सिंग यांचे अंत्यसंस्कार निगमबोध घाटावर, केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली सविस्तर माहिती
esakal December 28, 2024 05:45 AM

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं गुरुवारी रात्री निधन झालं. त्यांच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने शुक्रवारी मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्काराबाबत माहिती दिली. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

केंद्रीय गृहमंत्रालयाने सांगितलं की, सरकारने डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. अंत्यसंस्कार २८ डिसेंबरला सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी केले जातील. नवी दिल्लीतील निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. संरक्षण मंत्रालयाला मनमोहन सिंग यांच्यावर लष्करी सन्मानासह अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था करण्याची विनंती केली आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदींना विनंती केली होती की मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी असं ठिकाण निवडा जिथं त्यांचं स्मारक उभारता येईल. यासाठी काँग्रेसने पंतप्रधान मोदींना पत्रही लिहिलं आहे. तसंच कॉलही केला होता.

भारताच्या माजी पंतप्रधानांच्या अंत्यसंस्कारावेळी विशेष राजकीय प्रोटोकॉलचे पालन केले जाते. देशासाठी त्यांचं योगदाना आणि पदाच्या प्रतिष्ठेचा आदर करणं हा यामागचा उद्देश असतो. अंत्यसंस्काराआधी माजी पंतप्रधानांचं पार्थिव राष्ट्रीय ध्वजात गुंडाळण्यात येतं. तर मुखाग्नी देत असताना २१ तोफांची सलामी दिली जाते. ही सलामी सर्वोच्च सन्मानाचे प्रतीक मानली जाते. माजी पंतप्रधानांच्या अंत्ययात्रेवेळी सुरक्षा आणि प्रोटोकॉलचे काटेकोर पालन केलं जातं. सर्वसमान्य जनतेपासून ते अनेक खास व्यक्तीही अंत्यसंस्कारासाठी आलेले असतात.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.