बीड : जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी आज शनिवारी (ता. 28 डिसेंबर) बीडमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या सर्वपक्षीय आक्रोश मोर्चामध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसोबत सर्व संघटना आणि सर्वपक्षीय नेते रस्त्यावर आल्याचे पाहायला मिळाले. बीडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून मूक मोर्चा काढण्यात आला. हजारोंच्या संख्येने मोर्चात नागरिकांनी हजेरी लावली. हातात न्यायाचे फलक घेऊन महिला देखील या मोर्चात सामील झाल्या आहेत. आरोपीला फाशी झाली पाहिजे अशा प्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या आहेत. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावामध्ये कडकडीत बंद आहे. (Santosh Deshmukh Murder Vaibhavi Deshmukh emotional speech from protest march in Beed)
या आक्रोश मोर्चामध्ये संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हीने आज हा दिवस आमच्या परिवाराला पाहावा लागत आहे, अशी वेळ कोणावर येऊ नये, यासाठी आपण एकत्रित येऊ आणि त्याची दक्षता घेऊ, असे आवाहन केले आहे. तर, काल ढगाआड गेलेला सूर्य आज दिसतोय, पण मातीआड गेलेले माझे वडील मला कधीच दिसणार नाही, अशी भावना व्यक्त करत वैभवीने तिच्या वडिलांना न्याय मिळावा, अशी मागणी केली. तिच्या या मागणीनंतर आणि तिने व्यक्त केलेल्या भावनेमुळे अनेकांचे डोळे पाणवलेले पाहायला मिळाले. यावेळी वैभवी देशमुख म्हणाली की, आत्ताच मला माझ्या चाचाने सांगितलं, माझ्या वडिलांचा जन्म हा इथेच झाला होता. आनंद हॉस्पिटलमध्ये आणि माझ्या पणजीने त्यांचा नाव इथल्या संतोषी माते वरून संतोष असे ठेवले होते. म्हणून मी याच ठिकाणावर तुम्हा सर्वांना एक विनंती करते, माझ्या वडिलांना न्याय मिळालाच पाहिजे.
– Advertisement –
तसेच, तुम्हा सर्वांना माहिती आहे. त्यांची हत्या कशाप्रकारे झाली. त्यांचा याच्यामध्ये काही गुन्हा नसताना ते समाजसेवक असताना, समाजासाठी त्यांनी कार्य केले आणि शेवटपर्यंत ते समाजासाठी झुंजत होते. त्या दिवशी सुद्धा एका दलित समाजाच्या व्यक्तीची मदत करत असताना हा प्रसंग घडला. ही वेळ आज माझ्यावर आणि माझ्या कुटुंबाला ही वेळ आली आहे, दुसऱ्या कोणावर ही वेळ येऊ नये याची दक्षता आपण सर्वांनी घेतली पाहिजे, असे यावेळी वैभवीकडून आवाहन करण्यात आले. तर, जसं काल आभाळ आलं होतं, सूर्य झाकला होता. पण आज ऊन पडलं आहे, आज सूर्य चांगला प्रकारे दिसतो. पण, मातीआड गेलेले माझे वडील मला कधी दिसणार नाही आणि त्यांचे हे बलिदान आपण व्यर्थ म्हणून जाता कामा नये, असेही आवाहन यावेळी वैभवी देशमुखकडून करण्यात आले आहे.
– Advertisement –
तुम्ही सर्वांनी माझ्यासोबत राहा आणि माझ्या कुटुंबासोबत राहा. माझ्या वडिलांना न्याय मिळवून देऊ, हा लढा आपण सर्वांनी एकत्र येऊन पुढे जाऊन लढू. हा जो अन्याय सुरू आहे तो अन्याय पुन्हा होऊ नये म्हणून आपण लढू. आपण मिळून पुढे जाऊ. माझ्या वडिलांना आणि आपल्याला सर्वांना न्याय मिळवून द्यायचा आहे. तुम्ही असेच सोबत राहा, अशी विनंती सुद्धा यावेळी सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने केली आहे. या मोर्चामध्ये राष्ट्रवादी शरद पवर गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर, खासदार बजरंग सोनवणे, भाजपा आमदार सुरेश धस, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, माजी खासदार संभाजीराजे आणि अन्य नेतेमंडळी सहभागी झाली आहे.