Kashmir Snowfall Marathi News : काश्मीर खोऱ्यामध्ये सध्या बडा चिल्लई कलान, अर्थात सर्वाधिक थंडीचा काळ सुरू असून पूर्णतः शहर कसे गारठते आणि शहराचा सर्व व्यवहार ठप्प कसा होतो याची प्रत्यक्षानुभूती काश्मीरमध्ये आलेल्या पर्यटकांना येत आहे.
जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरामध्ये शुक्रवारी तापमान उणे पाच अंश सेल्सिअस होते. दुपारपर्यंत जणू सूर्योदय झाला नाही असे मानून सारे शहर सुस्तावले होते. तर दुपारी तीन वाजल्यापासून येथे हिमवर्षाव सुरू झाला. श्रीनगर हे फक्त एक शहर नसून ते काश्मीर खोऱ्याचे हृदय आहे. निसर्गप्रेमी, इतिहासप्रेमी आणि साहसी प्रवाशांसाठी ते एक परिपूर्ण ठिकाण आहे. याच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे ते भारतातील ‘स्वर्ग’ म्हणून ओळखले जाते.
त्यामुळेच कडाक्याच्या थंडीतही पर्यटकरूपी पाहुण्यांनी शहराच्या अर्थव्यवस्थेत धुगधुगी कायम ठेवली आहे. त्याचप्रमाणे थंडीतही इथले स्थानिक नागरिक दैनंदिन जीवनात आनंद शोधताना दिसत आहेत. येथील बाजारपेठांमध्ये पारंपरिक काश्मिरी हस्तकलांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, झेलमच्या काठावर वसलेली घरे आणि दुकाने पर्यटकांना आकर्षित करत आहेत.
हिमाच्छादित श्रीनगरहिवाळ्यातील श्रीनगर पूर्णतः वेगळे रूप धारण करते हे सध्या येथे अनुभवास येत आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात शहर हिमाच्छादित होते. दल सरोवराचा काही भाग गोठतो आणि संपूर्ण परिसर हिमाच्या चादरीने झाकला जातो. यामुळे पर्यटकांसाठी हा एक अनोखा अनुभव बनतो. शुक्रवारी येथे आलेल्या पर्यटकांना हा अनुभव घेता आला. लाल चौक आणि राजौरी बाजार या श्रीनगरच्या बाजारपेठांमध्ये सध्या थंडीतही पर्यटक येत असल्याने बाजारपेठेत दुपारनंतर वर्दळ पहायला मिळत आहे.
जनजीवनावर परिणामश्रीनगरमध्ये तापमान सतत उणे राहिल्याने शहरातील जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ डिसेंबर रोजी श्रीनगरमध्ये उणे ८.५ तापमान नोंदवले गेले, जे १९७४ नंतरचे सर्वांत कमी तापमान आहे. या तीव्र थंडीमुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या नळांमधील पाणी गोठले आहे, ज्यामुळे नागरिकांना पाणी मिळवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शहरातील प्रसिद्ध दल सरोवरही गोठले असून, त्याच्या पृष्ठभागावर अर्धा इंच जाडीचा बर्फाचा थर साचला आहे. रस्त्यांवर बर्फ साचल्याने वाहतूक मंदावली आहे. शहरातील रस्त्यांवरील हिम साफ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु सततच्या उणे तापमानामुळे या कामांमध्येही अडथळे येत आहेत.
First snowfall in Kashmir and its magical atmosphere