पाकिस्तानवर अफगाणिस्तानचा जोरदार हल्ला, रात्रभर भीषण युद्ध, पाकिस्तानचे 19 सैनिक ठार
GH News December 28, 2024 09:09 PM

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्याचा बदला अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने शुक्रवारी घेतला. शुक्रवारी रात्री अफगाणिस्तान सैन्याने पाकिस्तानच्या सैन्यावर भीषण हल्ला केला. अफगाणिस्तानने तोफा आणि मशीनगनने हल्ला करुन पाकिस्तानी सैन्याचे मोठे नुकसान केले. अफगाणास्थानमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या हल्ल्यात पाकिस्तानचे 19 सैनिक मारले गेले आहे. तसेच अनेक सैनिक जखमी झाले आहे.

दोन चौक्यांवर ताबा

तालिबानी संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी टोलो न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, डूरंग लाइनवर खोस्त आणि पाकटिओ भागांत हा हल्ला झाला. तालिबानने दावा केला की त्यांनी पाकिस्तानच्या दोन चौक्यांवर ताबा मिळवला आहे. तालिबानी सैनिकांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जप्त करत डूरंग लाइनवर असलेल्या पाकिस्तानी चौक्या जाळून टाकल्या. तसेच पाकट‍िआ जिल्ह्यातील डांड ए पाटन येथील पाकिस्तानी सेनेच्या दोन चौक्यांवर ताबा मिळवला. या चौक्यावर असलेले पाकिस्तानी सैनिक मारले गेले किंवा पळून गेले. तालिबान लष्काराने पाकिस्तानेच 19 सैनिक मारले गेल्याचे म्हटले आहे.

तालिबानी मीडिया अल मिरसादने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, तालिबानी सेनेने रात्री पाकिस्तानी ठिकाणांवर हल्ले केले. दांड पाटण जिल्ह्यातून ड्युरंड लाइनवरील डबगई भागात हे हल्ले करण्यात आले. याशिवाय तालिबानी सैन्याने खोस्त प्रांतातूनही पाकिस्तानी लष्कराच्या ठाण्यांवर हल्ले केले.अनेक भागात दोन्ही सैन्यांमध्ये गोळीबार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

व्हिडिओ व्हायरल

हल्ल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पाकिस्तानी लष्कराकडून त्यांच्या सैन्याचे झालेले नुकसान लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाकिस्ताने आमचा केवळ एक जवान मारला गेल्याचे म्हटले आहे. पहाटे साडेचार वाजता हा हल्ला झाल्याचे पाकिस्तानी सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात किमान तीन अफगाण ठार झाले असून नऊ जण जखमी झाल्याचेही त्यांनी सांगितले. पाकतिया प्रांत हा पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील कुर्रम जिल्ह्याच्या दुसऱ्या बाजूला आहे. शिया आणि सुन्नी वादामुळे येथील सीमा गेल्या 80 दिवसांपासून बंद आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.