Dhananjay Munde : राजकीय जीवनातून उठविण्याचा डाव..! मंत्री धनंजय मुंडे यांची विरोधकांवर टीका
esakal December 27, 2024 12:45 PM

मुंबई : ‘‘बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे तरुण सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना व त्यांचे जे कोणी सूत्रधार असतील त्यांना फाशीच दिली जावी. ही माझी पहिल्या दिवसापासूनची मागणी असून या प्रकरणातील तपास तातडीने पूर्ण करून आरोपपत्र दाखल केले जावे. हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालविले जावे व देशमुख यांच्या कुटुंबीयांना तातडीने न्याय मिळवून दिला जावा,’’ अशी भूमिका अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मांडली.

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे असणारे वाल्मीक कराड हे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून केला जात आहे. याच प्रकरणाबाबत चर्चा करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली. ‘‘ बीड जिल्ह्यातील एका तरुण सरपंचाची हत्या ही अत्यंत दुर्दैवी आणि तितकीच भयानक घटना आहे. त्यामुळे यातील कुठल्याही आरोपीचे, तो कुणाच्याही जवळचा असला तरी त्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही,’’ असे मत मुंडे यांनी व्यक्त केले.

सरकार म्हणून या प्रकरणांमध्ये कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही तसेच या प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढण्याच्या दृष्टीने पोलिसांचा तपास वेगाने सुरू असल्याचेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. या घटनेच्या आडून बीड जिल्ह्यामध्ये अनेक जणांकडून वेगळ्या पद्धतीचे राजकारण केले जात असून मला मंत्रिपद मिळू नये, पालकमंत्री पद मिळू नये यासाठी या घटनेचे दुर्दैवी राजकारण केले गेले व यातून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार सातत्याने सुरू आहे. काही जणांचा दिवसच माझ्यावर टीका करण्यात जातो. या घटनेशी कसलाही संबंध नसताना त्याच्याशी माझा संबंध जोडला जातो असेही मुंडे म्हणाले.

‘‘ या घटनेच्या आडून मला सामाजिक व राजकीय आयुष्यातून उठविण्याचा काही जणांचा डाव आहे मात्र ही घटना दुर्दैवी असून त्यातील आरोपींना फाशी मिळावी व खरे सूत्रधार समोर यावेत ही माझी भूमिका आहे व ती पहिल्या दिवसापासून आहे. त्यामुळे ज्यांना आरोप करायचे आहेत त्यांना करू द्या, अखेर घटनेतील सत्य व सूत्रधार समोर येईलच,’’ असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.

या प्रकरणाचे कोणीही समर्थन करणार नाही. केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास ‘सीआयडी’कडे दिला आहे त्यामुळे दोषींना पकडून त्यांना शिक्षा होईल याची खात्री आहे. बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस हे त्यांच्या मनातील वेदना बोलून दाखवीत आहेत. जो एखाद्या भागाचे प्रतिनिधित्व करतो त्याला आपल्या वेदना बोलून दाखविण्याचा अधिकार आहे. बीड येथे निघणाऱ्या मोर्चात जाण्यापासून आम्ही कोणाला रोखलेले नाही.

- रावसाहेब दानवे, भाजपचे नेते

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.