मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर ऑस्ट्रेलिया आणि भारत संघात कसोटी मालिकेतील चौथा सामना सुरू आहे. या बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथ याने शतक ठोकले आहे. या शतकासह त्याने अनेक विक्रम केले आहेत.
गुरुवारपासून (२६ डिसेंबर) सुरू झालेल्या या कसोटीत १६७ चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले. हे स्मिथचे या मालिकेतील सलग दुसरे शतक आहे. त्याने ब्रिस्बेनला झालेल्या तिसऱ्या कसोटीही शतकी खेळी केली होती. तसेच स्मिथचे हे ३४ वे कसोटी शतक आहे. याशिवाय त्याचे हे भारताविरुद्ध ठोकलेले कसोटीतील ११ वे शतक आहे, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भारताविरूद्धचे १६ वे शतक आहे. तो भारताविरुद्ध सर्वाधिक शतके करणारा क्रिकेटपटू आता ठरला आहे. कसोटीत भारताविरुद्ध ११ शतके करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू आहे. त्याने अवघ्या ४३ डावात भारताविरुद्ध ११ कसोटी शतके केली आहे. त्याच्यापाठोपाठ कसोटीत भारताविरुद्ध सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंमध्ये जो रुट असून त्याने भारताविरुद्ध ५५ डावात १० शतके केली आहेत.