बीडच्या प्रकरणात लक्ष घातलं, मग आरोपींना अटक का नाही?; अजित पवार यांना राष्ट्रवादीच्याच आमदाराचा सवाल
GH News December 27, 2024 02:10 PM

बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन 18 दिवस झाले तरी आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यातील जनतेत संतापाचं वातावरण आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या बीडमध्ये निषेध मोर्चा निघणार आहे. या मोर्चाच्या आधीच अजित पवार गटाच्या नेत्याने अजितदादांना घेरलं आहे. बीडच्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी लक्ष घातलं आहे, असं सांगितलं जात आहे. जर या दोन्ही नेत्यांनी या प्रकरणात लक्ष घातलं आहे तर खंडणी आणि हत्येतील आरोपी मोकाट कसे? त्यांना अजून अटक का नाही? असा सवालच अजितदादा गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी विचारला आहे.

आमदार प्रकाश सोळंके यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणात लक्ष घातलं आहे, असं म्हणतात. मग अद्यापही आरोपी आणि खंडणीखोरांना अटक नाही? राजाश्रय असल्याशिवाय या गोष्टी होतात का? एक आरोपी 18-18 दिवस फरार राहतो आणि पोलिसांना त्यांना पकडता येत नाही. खून करणाऱ्याला पकडता येत नाही. खंडणी मागणाऱ्याला पकडता येत नाही. हे काही नॉर्मल आहे का? यात कुणाचा तरी दबाव आहे, त्याशिवाय हे होणार नाही, असा हल्लाच प्रकाश सोळंके यांची चढवला.

त्याशिवाय हत्या होत नाही

बीड जिल्ह्यात पोलीस यंत्रणा हाताशी घेऊन खंडणी वसूल करण्याचं काम झालं आहे. याला कोण जबाबदार आहे? या सर्व प्रकरणामागे कोण आहे? हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांनी ठरवलं पाहिजे. या प्रकरणामागे राजकीय समर्थन असल्याशिवाय अशी प्रकरणं होत नसतात. याला निश्चितपणे सत्तेवरील माणसाचा आशीर्वाद असल्याशिवाय हे प्रकरणं होत नाही. त्यामुळे फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांनी या बीड जिल्ह्याकडे लक्ष द्यावं.

मागच्या दोन वर्षात किती खून झाले? खंडणी घेतल्या? किती अवैध धंदे झाले? किती वाळूचा धंदा झाला हे तातडीने तपासलं पाहिजे. 18 दिवस झाले खून होऊन. उद्या मोर्चा निघणार आहे. सामान्य लोकांचा आक्रोश आहे. आरोपीला अटक होत नाही हे बीड जिल्ह्याचं दुर्देव आहे, असंही ते म्हणाले.

मग पोलीस यंत्रणा काय करते?

या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करायची असेल तर राजकीय हस्तक्षेप होऊ नये. फडणवीस तसे सांगत आहेत. मला फडणवीस यांना विचारायचं आहे की, आज 18 दिवस झाले आरोपींना अटक का होत नाही? खंडणी आणि खूनातील आरोपी मोकाट आहे. 18 दिवस आरोपींना अटक होत नाही तर मग पोलीस यंत्रणा काय करत आहे?, असे सवालच त्यांनी केले.

पोलिसांचं दुर्लक्ष

या संपूर्ण प्रकरणात विंड मिलचा प्रोजेक्ट आहे. या मिलकडून खंडणी उकळण्यासाठी त्याला धमक्या देण्यात येत होत्या. त्यातून ही हत्या झाली. त्याच्या दोन दिवस आधी आरोपी विंड मिलवर दादागिरी करत होते. त्यामुळेच मस्साजोगच्या सोनावणे नावाच्या वॉचमनने सरपंचांना फोन करून बोलावलं. या ठिकाणी काही लोक आले आहेत. ते मारहाण करत आहेत, असं त्याने सांगितलं. त्यामुळे संतोष देशमुख सरपंच म्हणून तिथे गेले. त्यांनी गुंडगिरी करणाऱ्या टोळक्याला हुसकावून लावलं. तिथे शाब्दिक चकमक झाली. मारामारी झाली. पण देशमुख यांनी टोळक्याला हुसकावून लावलं. त्याचा राग मनात ठेवून ही खुनाची घटना घडली आहे.

देशमुख यांनी गुंडाना हुसकावून लावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे आरोपींना वाटलं आपला मोठा अपमान झाला. आपल्या दादागिरीच्या प्रतिमेला धक्का पोहोचला आहे. त्यातून ही हत्या घडली, असा दावा त्यांनी केला. विंड मिलच्या मालकाने पोलिसांना खंडणीची तक्रार दिली होती. पण पोलिसांनी तिकडे लक्ष दिलं नाही. त्यानंतर ही खुनाची घटना घडली. म्हणजे पोलिसांचं याकडे अक्षम्य दुर्लक्ष झालं आहे, असा आरोपही त्यांनी केला.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.