भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे गुरूवारी निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशभरात शोककळा पसरली असून राजकीय मंडळीसह सेलिब्रिटींंनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अभिनेता रितेश देशमुख, मनोज बाजपेयी, दिलजीत दोसांझसह, दिशा पटानी यासह अनेक कलाकारांनी डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली आहे.
अभिनेता दु:ख व्यक्त करत वडील विलासराव देशमुख यांच्यासोबतचा मनमोहन सिंग यांचा फोटो शेअर केला आहे, "आज आम्ही भारतातील एक उत्कृष्ट पंतप्रधान गमावले आहेत. भारताच्या आर्थिक विकासाला चालना देणारे ते प्रतिष्ठा आणि नम्रता याचं उत्तम उदाहरण होते. आम्ही कायम त्यांचे ऋणी राहू. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, धन्यवाद श्री मनमोहन सिंग जी." अशी पोस्ट शेअर केली आहे.
जेनेलिया डिसूझाने दुख शेअर करत , "आमचे माजी पंतप्रधान श्री. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल ऐकून मला खूप दु:ख झालं. एक राजकारणी, अर्थतज्ज्ञ आणि खरा देशभक्त, त्यांनी आपल्या मागे सचोटी, शहाणपण आणि निस्वार्थ सेवेचा वारसा सोडला आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो."
सनी देओलने दु:ख व्यक्त करत म्हटले आहे की, "भारताच्या आर्थिक उदारीकरणाला आकार देण्याची महत्वाची भूमिका बजावणारे दूरदर्शी नेते डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाल्याने मला दु:ख झाले आहे.त्यांचे देशासाठीचे योगदान कायम स्मरणात राहील."
कपिल शर्माने भावूक पोस्ट शेअर केली आहे. कपिलने मनमोहन सिंग यांच्याबरोबरचा फोटो पोस्ट करत, "भारताने आज एक उत्कृष्ट नेता गमावला आहे. ते भारताच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार आणि विनम्रतेचे प्रतीक होते. डॉ. मनमोहन सिंग यांनी प्रगती आणि आशेचा वारसा मागे सोडला आहे. त्याच्या दूरदृष्टीने देशाचा कायापालट झाला. डॉ. सिंग, तुमचे योगदान कधीही विसरता येणार नाही."
मनोज बाजपेयीनीं भावूक पोस्ट शेअर केली आहे. "आपल्या माजी पंतप्रधान यांच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख झाले. देशाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील," असं पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अभिनेत्री दिशा पटानीने पोस्ट शेअर करत श्रद्धाजंली वाहिली आहे. पोस्टमध्ये तिने "भारताचे माजी डॉ. मनमोहन सिंग हे दूरदर्शी नेते होते. त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेचा कायापालट केला. त्यांचे योगदान कायम स्मरणात राहिल." असं म्हटलं आहे.