पंजाबमधील भटिंडा येथे प्रवाशांनी भरलेल्या बसला अपघात झाला. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून थेट नाल्यात पडली. त्यानंतर हा भीषण अपघात झाला. अपघात झालेल्या बसमध्ये सुमारे 50 प्रवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, भटिंडा येथील जीवनसिंग वालाजवळ भीषण अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून थेट खाली असलेल्या घाण नाल्यात पडली आहे. प्रशासन व स्थानिक नागरिक बसच्या काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढत आहेत. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या बसमध्ये सुमारे 50 प्रवासी होते.
एका खासगी वाहतूक कंपनीची बस भटिंडा-शार्दुलगड लोकल मार्गावर धावत होती. भटिंडा येथे एका खासगी कंपनीची बस कर्मचाऱ्यांना घेऊन जात होती. दुपारच्या ब्रेकनंतर बस जीवनसिंग वाला या गावी पोहोचली असता नाल्यावरील पुलावर बसचे नियंत्रण सुटून ती नाल्यात पडली. अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूचे लोक घटनास्थळी जमा झाले. यानंतर जखमींना बाहेर काढण्यात आले.
जखमींना बसमधून रुग्णालयात नेण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू आहे. हा अपघात कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भटिंडाचे एसएसपी अवनीत कोंडल अपघातस्थळी पोहोचले आहेत. एसएसपी अवनीत कोंडल यांनी सांगितले की, तलवंडी साबोचे एसएचओ घटनास्थळी पोहोचले.
पाऊस पडत असण्याची शक्यता असून बसचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाला असावा. मात्र हा अपघात कसा झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. अपघातग्रस्त बसमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. 24 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
आम आदमी पक्षाच्या तलवंडी साबो येथील आमदार बलजिंदर कौर यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. या दुर्दैवी घटनेबद्दल ऐकून धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले. बलजिंदर कौर म्हणाल्या की, माझे डीसी शौकत अहमद परे यांच्याशी फोनवर चर्चा झाली. जवळपास सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. हा अपघात कसा घडला? हे अद्याप कळू शकलेले नाही.