ड्रीम इलेव्हनने मारली बाजी
Marathi December 28, 2024 07:24 AM

ड्रीम इलेव्हन वेंगसरकर क्रिकेट अकादमी, चर्चगेट संघाने दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनच्या वतीने माहुल येथे आयोजित केलेल्या ड्रीम इलेव्हन कप या 12 वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत त्यांनी एम.सी.सी. (मुंबई क्रिकेट क्लब), सांताक्रुझ संघावर 5 विकेट्स आणि 17 षटके राखून दणदणीत विजय मिळविला. 53 धावांची खेळी करणारा आराध्य कळंबे हा त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

या स्पर्धेच्या पुरस्कार सोहळय़ाप्रसंगी शालेय क्रिकेटपटूंना मोलाचा सल्ला देताना हिंदुस्थानचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी ‘मोठय़ा खेळी करण्याची सवय लावून घेणे ही खरेतर यशाची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले. उपविजेता ठरलेल्या मुंबई क्रिकेट क्लब हा संघ 40 षटकांच्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 31.1 षटकांत 172 धावांत गारद झाला. आपल्या वाटय़ाची 40 षटके न खेळता त्यांनी तब्बल 9 षटके वाया घालवली याच गोष्टीकडे त्यांनी मुलांचे लक्ष्य वेधले. या नऊ षटकांच्या खेळात तुम्ही किमान 40-45 धावा केल्या असत्या तरी त्या निर्णायक ठरू शकल्या असत्या, असे त्यांनी सांगितले. शिवाय नियमित क्रिकेटचे फटके खेळा, हल्ली टी.व्ही.वर दिसणाऱया टी-20 सामन्यातील मारलेले कसेही फटके मारण्याचा प्रयत्न करू नका, असाही सल्ला त्यांनी मुलांना दिला. दीर्घ खेळी आणि त्यासाठी उच्च दर्जाचे टेम्परामेंट या गोष्टी तुम्हाला भविष्याच्या दृष्टीने मोलाच्या ठरतील,’ असेही त्यांनी सांगितले.

आराध्य कळंबेला अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळाला तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू आणि सर्वोत्तम फलंदाज म्हणून ड्रीम 11 संघाच्या विहान अस्वले (177 धावा आणि 1 विकेट) याला गौरविण्यात आले. सर्वोत्तम गोलंदाज म्हणून ड्रीम 11 च्या डॅनियल याची तर सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून शिवाजी पार्क जिमखान्याच्या सूरज शाह याची निवड करण्यात आली.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.