Auto Accident : ऑटोची दुभाजकाला धडक, मायलेकाने गमवला जीव; भाचीच्या वाढदिवसावरून येताना काळाचा घाला
esakal December 28, 2024 05:45 PM

नागपूर : भाचीचा वाढदिवस साजरा करून घरी परतत असताना, एमआयडीसी परिसरात प्लास्टो कंपनी समोर वळणावर ऑटो दुभाजकाला धडकल्याने चालकासह त्याच्या आईचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

रोहित साखरे (वय २५) आणि त्याची आई करुणा गोपाल साखरे (वय ४९, दोन्ही रा. राजीवनगर) अशी मृत मायलेकांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित हा घरात मोठा असून तो सुरक्षारक्षक म्हणून काम करतो.

त्याचा लहान भाऊ हा ऑटोचालक आहे. गुरुवारी त्याच्या भाचीचा जरीपटका येथे वाढदिवस होता. त्यामुळे त्याने आईसह भावाचा ऑटो घेऊन बहिणीकडे गेला. कार्यक्रम साजरा करून तो घरी परत येत वाडीमार्गे एमआयडीसीच्या मार्गाने सिमेंट रस्त्यावरून येत होता.

रात्र असल्याने वाहतूक तुरळक होती, दरम्यान त्याने ऑटोचा वेग वाढविला. तेव्हाच परिसरातून राजीवनगरकडे वळत असताना, त्याचा ऑटो दुभाजकाला जाऊन धडकला. यामुळे ऑटोचा चुराडा झाला. त्यात रोहित अडकून पडल्याने त्याचा मृत्यू झाला.

याशिवाय आई सिमेंट रस्त्यावर फेकल्या गेली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळताच, त्यांनी घटनास्थळी ताफ्यासह धाव घेत, पंचनामा करीत मृतदेह मेडिकलमध्ये रवाना केला. याप्रकरणी चालक रोहीत याच्यावर गुन्हा दाखल केला असून पोलिस प्रकरणाचा तपास करीत आहे.

अप्रशिक्षित असताना चालविला ऑटो?

रोहित स्वतः सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होता. त्याचा लहान भाऊ ऑटोचालक होता. मात्र, तो काही कामानिमित्त बाहेर गेल्याने तो त्याच्या ऑटोमध्ये आईला घेऊन गेला होता. दरम्यान वेगाने असलेला ऑटो नियंत्रित करण्याचे कौशल्य त्याच्याकडे नसल्याने हा अपघात झाला. ज्यात त्याला आईसह प्राण गमवावे लागले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.