मी, दीनानाथ मंगेशकर... (भाग ३)
esakal December 29, 2024 08:45 AM

- हृदयनाथ मंगेशकर, saptrang@esakal.com

दीदीनं बाबांना घाबरून विचारलं :

‘‘हे काय दाखवता मला?

बाहेर फक्त अंधार आहे.’’

‘‘माझं भविष्य! लता, हा शनी मला सरळ सोडणार नाही

आता माझे सगे-सोयरे येतील

सगळ्यांचं मागणं एकच...फक्त पैसा

‘माझी पडदा ओढण्याची मजुरी’

‘मी रंगभूषा वेशभूषा सांभाळतो...माझी मजुरी’

‘मी थिएटरवाला’

‘मी किराणावाला’

‘मी जाहिरातवाला’

‘मी स्वयंपाकी’

सारे इथं येणार...यांची देणी दिली की

‘मी नायक’

‘मी स्त्रीभूमिका’

‘मी खलनायक’

‘मी विनोदी नट’

आमचा पगार, जेवणाचा-राहण्याचा खर्च

आमचा प्रवासखर्च...

अशी एकच मागणी.. फक्त पैसा, पैसा आणि पैसा...

मी यांचा संगीतगुरू, कंपनीचा मालक

माझे आणि यांचे संबंध जुने

पण आज हे सारे पैशामुळं धुळीस मिळणार

मी येणाऱ्या प्रसंगाला तोड देणार’’

‘‘तेही न जेवता?’’

दीदी बाबांना चिडवत म्हणाली

बाबा हसत म्हणाले :

‘‘बापाची टिंगल करतेस?

पण छान वाटलं. विनोदबुद्धी असणं

हे फार छान लक्षण आहे.’’

‘‘बाबा, मी गंमत करत नाही

मनापासून बोलतेय...बाबा, तुम्ही जेवत नाही

फक्त तांब्यातलं पाणी पिता

अशा वागण्यानं

तुम्ही येणाऱ्या प्रसंगांना कसं तोंड देणार?’’

दीदीनं कळवळून विचारलं

‘‘चिंता करू नकोस

मी या प्रसंगांना तोंड देणार...न भीता, न पळ काढता

लता मी संगीताची, ज्योतिषशास्राची

आणि सग्या-सोयऱ्यांची

प्रामाणिक सेवा केली आहे

लता, रियाजी माणूस फार धाडसी असतो

त्याला माहीत असतं की,

हे रियाजाचं कवच कुठल्याही परिस्थितीत

आपलं संरक्षण करेल

लता, गृहस्थावर शस्त्र उचलता येतं

पण संन्याशावर शस्त्र उचलता येत नाही’’

‘‘म्हणजे बाबा, तुम्ही संन्यासी आहात?

मला सोडून तुम्ही संन्यासी घेणार ?’’

‘‘होय बेटा, मी फार आधी

संन्यास घेतला आहे

संन्यास म्हणजे

भगवी कफनी घालून जंगलात जाणं असं नव्हे

भगवे कपडे म्हणजे संन्यास

ही कल्पना मनातून काढून टाक

कलाकाराचा संन्यास म्हणजे

स्वरात ‘स्व’ विसर्जित करणं

ब्रह्म जसं उष्टं नाही, तसा सच्चा सूरही उष्टा नाही

ब्रह्म शोधायला साधू जसे वनाकडं निघतात

तसे आपण कलाकार

सच्चा स्वर शोधण्यासाठी

विश्वात अपार्थिवतेचा शोध घेत, स्वरात विलीन होतो.’’

‘‘होय बाबा, तुम्ही काय म्हणता ते कळत नाही

पण तंबोऱ्यावर गाताना

काहीसं हरवल्यासारखं वाटतं’’

दीदी गंभीरपणे, समजदारीनं,

कुठं तरी भिरभिरल्यासारखं म्हणाली

‘‘होय लता, हीच गुरुकृपा

यालाच अनुग्रह म्हणतात’’

बाबाही गंभीर होत म्हणाले

‘‘बरं, संन्यासीमहाराज! अन्नत्याग तर

केलाच आहे, आता निद्रात्याग नको

महाराज! आता निद्रेची आराधना करा’’

‘‘लता, आज बापाची सारखी टिंगल करतेस...

पण या भयाण वातावरणात

तुझी टिंगलही एक गोड गाणं भासतं.

पण चल, आता ‘सगेसोयरे’ येण्याआधी

थोडा आराम करू.’’

परेशाँ रात सारी है, सितारों तुम तो सो जाओ

सुकूत-ए-मर्ग तारी है, सितारों तुम तो सो जाओ

हमे तो आज की शब पौ फटे तक जागना होगा

यही किस्मत हमारी है, सितारों तुम तो सो जाओ

कहे जाते हो दुनिया से हमारा हाल रो रो कर

ये कैसी राजदारी है, सितारों तुम तो सो जाओ

हमे भी निंद आ जाएगी, हम भी सो ही जाएँगे

अभी कुछ बेकरारी है, सितारों तुम तो सोजाओ

तारकांनो, तुम्ही निर्धास्तपणे झोपी जा

‘‘मालक, अहो मालक, उठा.

आम्ही सर्वजण आलो आहोत.’’

‘‘अरे! या, या...जरा डोळा लागला होता...

बोला, आज काय झालं ते मामांनी सांगितलं

तुम्ही येणार हेही मामांना माहीत होतं’’

‘‘मग काय सांगितलं त्यांनी?’’

एका सामान्य नटानं उद्धटपणे विचारलं

बाबांनी त्याच्याकडं शांतपणे पाहिलं

आणि म्हणाले :

‘‘परवा सांगलीमुक्कामी या

साऱ्यांचे पगार, जेवणाचा खर्च, राहण्याचा

खर्च, रेल्वेभाडं...असे सारे पैसे एकरकमी देऊ

हिशेब राहणार नाही’’

‘‘परवा म्हणजे दोन दिवसांनी?

म्हणजे तीन दिवसांनी

आम्हाला पैसे मिळणार

पण मालक, तीन दिवस खाणार काय?

मालक, दोन महिन्यांचा पगार नाही

इथून सांगलीपर्यंत चालत जायचं का?

आणि सांगलीत सर्वांनी हात वर केले

तर काय करणार?’’

परत त्याच नटानं आवेशानं विचारलं

बाबा शांतपणे विचारलं :

‘‘काय नाव तुझं?’’

‘‘हरी गुरव’’

‘‘हरी, नवीन दिसताय तुम्ही

मी माझं रक्त आटवून

तुम्हाला आजपर्यंत सांभाळलं आहे

हात वर करायचे असते तर

ते आधीच केले असते

पण आजकाल नाटकांना उत्पन्न होत नाही

तुमच्या मागण्या बरोबर आहेत

गेल्या सहा महिन्यांत

किडुक-मिडुक विकून

तुम्हाला तदास लागू दिली नाही

पण नाटकांना उत्पन्न होतच नाही’’

‘‘मग बंद करा कंपनी. कर्ज काढा,

दागिने विका. सामान विका

नाहीतर सामानाचा लिलाव करा

काहीही करा...पण आम्हाला

उपाशी मारू नका...’’

हरी गुरव ओरडत सुटला

‘‘बस्स करा. आता एकही शब्द बोलू नका

कुणाशी बोलताय तुम्ही?

प्रसंगी मी स्वतःला विकेन

पण तुमची एक पैही बुडवणार नाही.

बस्स, मधे बोलू नका...शिरपुरे, तुम्ही सारी

व्यवस्था बघत असता. तुम्ही काय सुचवाल?’’

‘‘मालक, मी आज धुळ्यातल्या

साऱ्या सावकारांना भेटलो...

पण कुणीही कर्ज द्यायला तयार नाही

आणि देणेदार तर सारखा तगादा लावत आहेत

आज स्वयंपाकी म्हणाला :

‘हे शेवटचं जेवण...कारण, सारं धान्य,

सामग्री संपली आहे.’

मालक, मला एकच उपाय दिसतोय...

कंपनीच्या सामानाचा लिलाव करावा

आणि सारी देणी द्यावीत’’

‘‘का ऽऽ य? लिलाऽऽव?

करा, करा, लिलाव करा

ही चांदीची भांडी, या साखळ्या...

माझा ॲार्गन, हे जरीचे कपडे...

सावरकरांचं ‘संन्यस्त खड्ग’

वीर वामनरावांचं ‘रणदुंदुभी’

काय भाव येतोय ते बघा...

आणि ते राम गणेश गडकरींचं ‘भावबंधन’

लवकर लिलाव करा.

ती लतिका, तो घनश्याम...

ती सुलोचना, ती वसुंधरा, तो कामण्णा,

तो गोकुळ, तो धैर्यधर...

ते, ‘झाले युवती मना...’

ते ‘चंद्रिका ही जणू...’

ते ‘प्रेमसेऽऽवा शरण...’

ते ‘शूरा मी वंदिले...’

ते ‘सुकतातचि जगी या...’

ते ‘परवशता पाश दैवे...’

हा दीनानाथ, तो कोल्हटकर,

तो दामुअण्णा मालवणकर, तो गणपत मोहिते

ते चंद्रकांत गोखले...

साऱ्यांना चांगला भाव येईल

विका, लिलाव करा, भांडी बडवा...

म्हणा : ‘बलवंत संगीत नाटक कंपनीचा

कला-संगीत-साहित्यासह भव्य लिलाव...’’

बाबा बेभान होऊन ओरडायला लागले

‘‘मालक, अहो मालक! असं काय करताय?

लिलाव म्हणजे

बाजारात जाऊन लिलाव करणं नाही

मीच साऱ्या कंपनीचा माल

एकरकमी किमतीत विकत घेतो

म्हणजे कर्ज काढणं, हुंडी फिरवणं

असं तुम्हाला काही करावं लागणार नाही

मी पैसे देतो, सारं सामान घेतो

तुम्ही कर्जमुक्त व्हा, सारं सरळ होईल’’

शिरपुरे तावातावात म्हणाले

बाबा हसून म्हणाले :

‘‘वा,शिरपुरे! धन्यवाद, शिरपुरे...

माझी अब्रू जाऊ नये म्हणून

तुम्ही किती कष्ट घेताय? किती प्रयत्न करताय?

पण कंपनीचं वर्षानुवर्षं जमलेलं-जमवलेलं

मौल्यवान सामान

तुम्ही फक्त यांचे पगार आणि जेवण

यासाठी मागताय?

तुमच्या सदसद्विवेकबुद्धीला हे पटतंय!?’’

‘‘खड्ड्यात गेली बुद्धी

आम्हाला आमचे पगार हवेत

मालक, तुमचं ठीक आहे...सांगलीला घर आहे तुमचं

आम्ही कुठं जायचं?

आमचं भवितव्य काय?

कंपनीचं दिवाळं वाजलं आहेच

आता आमचं दिवाळं वाजवू नका...’’

सारे जण बोलता बोलता ओरडू लागले

आई, मुलं घाबरून बाबांकडं पाहू लागली

बाबा शांत होते

मघाचा उद्रेक आता पार ओसरून गेला होता

‘‘ठीक आहे, शिरपुरे!

मी कंपनीचं सारं सामान तुम्हाला विकतो

आधी या साऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करा

मग कागदपत्रे वगैरे

सारं कायदेशीर होऊ द्या.’’

‘‘मालक कागद तयारच आहेत

आम्ही ते करूनच इथं आलो आहोत’’

शिरपुरे निर्लज्जपणे म्हणाले

बाबांनी स्थितप्रज्ञाप्रमाणे सर्व कागदांवर सह्या केल्या

सारे अपराध्यासारखे पुढं आले

काही मोठे कलाकार होते

काही बाबांकडे गाणं शिकत होते.

बाबांच्या पायाला हात लावून

सारे जड पावलांनी बाहेर पडले

बाबांनी दीदीला जवळ घेतलं

समोर उठणाऱ्या धुळीच्या गुबाऱ्यात

सारं लोप पावत होतं...

‘‘लता, ते बघ माझे सारे सोबती

मला सोडून जात आहेत

बघ त्यांच्या आकृती अंधारात

धुळीच्या गुबाऱ्यात कशा

विलीन होत चालल्या आहेत.

कारवाँ गुजर गया...गुबार देखते रहे

पाँव जब तलक उठे

के जिंदगी फिसल गई

चाह तो निकल सकी न

पर उमर निकल गई

कारवाँ गुजर गया...गुबार देखते रहे

‘‘मालक, मालक...गावातून बरीच माणसं

तुम्हाला भेटायला आली आहेत’’

बाबांचा खास विश्वासू नोकर विठ्ठल

काळजीनं म्हणाला

‘‘अरे, आता नवीन काय?

मघाशीच तर सारे

हिशेब चुकते केले ना?

आता हे काय नवीन?’’ बाबा कंटाळून म्हणाले

आणि थोड्याच वेळात दहा-बारा माणसं

आली.

‘‘मास्तर, बरं झालं...

तुम्ही अजून इथंच आहात

वाडा सोडून

मास्तर सांगलीला निघाले आहेत असं कळलं

म्हणून आम्ही घाईघाईनं इथं आलो’’

ती माणसं म्हणाली

‘‘हो, आम्ही उद्या निघणारच आहोत;

पण आपलं काही विशेष काम?’’

‘‘होय मास्तर, आमचे पैसे अजून मिळाले नाहीत’’

‘‘असं कसं होईल?

काल कंपनीचं सारं सामान विकून

मी सारे पैसे शिरपुरेंना

दिले,’’ बाबा गोंधळून म्हणाले

‘‘बरोबर मास्तर... शिरपुरेंनी कंपनीच्या

सर्व कलाकारांचे पैसे दिले

पण आमचे धुळेकरांचे पैसे दिले नाहीत

आणि सर्व सामान घेऊन शिरपुरे गेलेसुद्धा

मास्तर, आता तुम्हीच आमचे पैसे द्या’’

‘‘कुणाकुणाचे पैसे राहिले आहेत?’’

‘‘थिएटर, जाहिरात, किराणा, मजूर...

कुणाचेच पैसे दिले नाहीत, मास्तर.

आता तुम्हीच आमचे पैसे द्या’’

‘‘कुठून देऊ? सारं सामान विकून टाकलं

एक मार्ग आहे...तुम्ही सांगलीला या

मी एकरकमी सारी रक्कम अदा करतो

‘‘नाही मास्तर, आम्ही सांगलीला येणार नाही

तुम्ही धुळ्यात कर्ज केलं आहे

सांगलीचा काय संबंध?

धुळ्यात आम्ही पोलिसात तक्रार तरी करू शकतो

पण सांगलीत आमचं कोण ऐकणार?’’

‘‘पण या क्षणी मी कुठून पैसे आणू?’’

बाबा हतबुद्ध होऊन म्हणाले

‘‘कुठूनही आणा...तो प्रश्न नाही.

शिरपुरेंनी तुम्हाला फसवलं

यात आमचा काय दोष?

मास्तर, आम्ही तुमची अब्रू करतो...

पण उद्या हे प्रकरण पोलिसात गेलं,

वर्तमानपत्रात गेलं, तर मास्तर, तुमची अब्रू जाईल

पोलिस तुम्हाला सांगलीला जाऊ देणार नाहीत...

आम्ही तुम्हाला घाबरवत नाही

पण मास्तर तुमची अब्रू ऽऽ’’

‘‘मी जिवंत आहे अजून...कुणाला पोलिसांचा धाक धाकवता?

किती रुपयाची देणी आहेत?

एकरकमी देते

आधी मालकांचे पाय धरून माफी मागा

तुम्ही विसरलात? मी खानदेशची आहे. तुम्हीही खानदेशचे

हरिचंद रामदास लखासा लाड

हे नाव विसरलात तुम्ही?

हरिचंदांची मुलगी आहे मी

मनात आणलं तर

इथंच तुमचे मुडदे गाडू शकते

चला, आधी माफी मागा,’’

माई एकदम कडाडली

‘‘माई, क्षमा करा.

आम्ही मास्तरांना असं कसं बोलू?

चूक झाली, आम्ही मास्तरांची मुलं...

त्यांची काय माफी मागायची? दोन कानाखाली द्या...

पण रागावू नका’’

‘‘ठीक आहे... किती पैसे द्यायचेत तुमचे?’’

‘‘बरोबर सात हजार...’’

‘‘हे घ्या दहा हजाराचं स्त्रीधन

कायदेशीर कागद करा. सात हजार घ्या

उरलेले तीन हजार सांगलीला पाठवून

द्या; पण आधी सात हजाराची पक्की पावती द्या

आणि मगच जा’’

माईने त्यांना दागिन्यांचं गाठोडं दिलं

त्यांनी पावती दिली

आणि खालच्या मानेनं सर्वजण गेले

फक्त दोन माणसं रेंगाळत उभी होती

माई जोरात ओरडली :

‘‘तुम्ही काय करताय इथं?’’

‘‘माई, मला ओळखलं नाही?

मी चंद्रकांत गोखले, हा मामा पेंडसे’’

‘‘अरे चंद्रकांत, तू इथं काय करतोस?

शिरपुरेंनी तुला पैसे दिले ना?

माझ्याकडं आता काही नाही...’’

बाबा तेथूनच म्हणाले

‘‘पण मालक, आम्ही पैसे मागायला आलोच नाही मुळी...

आम्ही आता पुण्याला जाणार

काही काम मिळतं काय ते पाहणार

आम्हाला आशीर्वाद द्या,’’

‘‘पण शिरपुरेंनी तुमचा पगार दिला ना?’’

‘‘नाही मालक, शिरपुरेंनी आम्हालाही फसवलं’’

‘‘अरेरे! म्हणजे तुमचा पगार माझ्या डोक्यावर आहे

तुम्ही जेवा, तिकीट काढा

आणि पुण्याला जाऊन काम शोधा

मंगेश तुम्हाला यश देईल

हे घे... ’’

बाबांनीं बोटातली अंगठी काढून

ती चंद्रकांत गोखले यांच्या हाती दिली

माईनं सुस्कारा सोडला

‘‘झालात ना अवधूत?’’

माई स्वतःशी हसत म्हणाली

‘‘बाबा, तुम्हाला सर्वजण सोडून गेले...’’

दीदी गंभीरपणे म्हणाली

झालेल्या साऱ्या प्रकारानं ती एकदम प्रौढ झाली होती

‘‘लता, ‘ते सर्वाही सदा सज्जन। सोयरे होतू।’

सारे सगेसोयरे सोडून गेले बघ

आता मी मुक्त

‘‘बाबा, इतकं रामायण घडूनही

तुम्ही इतके शांत कसे राहू शकता?

हे कसं शक्य आहे!?’’

‘‘शक्य आहे बेटा...

कारण, मी एक ‘विचार’ आहे.

माझ्या प्रत्येक कृतीचा मीच जबाबदार आहे

मी ऐऱ्यागैऱ्याचा विचार नाही

मी एक स्वतंत्र ‘विचार’ आहे

कुणाचा? तर, ईश्वराचा!

मी पदचिन्ह आहे,

कुणाचं? तर, ईश्वराचं!

मी कशाला विचार करू माझ्या बरबादीचा?

दुःख ना आनंदही

अन् खंत ना आरंभही

नाव आहे चाललेली

कालही अन् आजही

चल, कालपासून उपाशी आहे. भूक लागली आहे. श्रीमती, वाढ बाई...

कालपासून एकच गाणं ऐकतो आहे

पैसा, पैसा, द्या, द्या...पैसा, पैसा...

मालक, गुरू, एक आधारू...

काही अर्थ नाही या नात्यांना

तुम भी चले चलो यूँही जब तक चली चले

बाहेर तीच धूळ... तोच मळकट अंधार...

मै खयाल हूँ किसी और का

मुझे सोचता कोई और है

(मी एक विचार आहे, दुसऱ्याचाच,

म्हणजे ईश्वराचाच,

आणि या विचाराचा विचार

कुणी अन्यच करतोय.)

सर-ए-आईना मेरा अक्स है

पस-ए-आईना कोई और है

(आरशात जरी माझं प्रतिबिंब

दिसत असलं

तरीही मनाच्या दर्पणात कुणा

दुसऱ्याचंच प्रतिबिंब आहे.)

तुझे दुश्मनों की खबर न थी

मुझे दोस्तों का पता नही

(तुला कळलंच नाही की तुझे

वैरी कोण आहेत...

आणि, मला माझ्या मित्रांचा

पत्ता मिळालाच नाही.)

तेरी दास्ताँ कोई और थी

मेरा वाकिया कोई और है

(तुझी कहाणी काही वेगळीच होती,

माझं वर्तमान काही वेगळंच आहे.)

मै खयाल हूँ किसी और का

मुझे सोचता कोई और है

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.