Manmohan Singh: मनमोहन सिंगांच्या कार्यकाळात गुंतवणूकदार झाले मालामाल; शेअर बाजाराने किती रिटर्न दिला?
esakal December 28, 2024 05:45 PM

Manmohan Singh Stock Market: देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अखेरचा श्वास घेतला. 1991 मध्ये त्यांनी भारताचे दरवाजे जगासाठी उघडले. उदारीकरणाचे युग सुरू करून विदेशी कंपन्यांना भारतात येण्याची परवानगी दिली. त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणांनी देशाला पुढे नेले.

तसेच 2008 ची मंदी भारताला जाणवली नाही कारण त्यामागे मनमोहन सिंगांचे आर्थिक धोरण होते. दुसरीकडे मनमोहन सिंगांच्या पॉलिसीमुळे शेअर बाजाराने मोठी झेप घेतली.

त्यांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात सेन्सेक्स 5 पटीने वाढला. विशेष म्हणजे 2004 ते 2014 या 10 वर्षांत शेअर बाजार केवळ दोनदाच नकारात्मक राहिला. तर या वर्षात गुंतवणूकदारांनी प्रचंड नफा कमावला.

शेअर बाजाराने 5 पट दिला रिटर्न

देशाचे माजी पंतप्रधान आणि जगातील महान अर्थतज्ञ मनमोहन सिंग यांच्या काळात शेअर बाजारात मोठी वाढ झाली होती. 2004मध्ये पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला तेव्हा सेन्सेक्स 4,961 अंकांवर होता. 2014 मध्ये सरकार बदलले तेव्हा सेन्सेक्स 24,693 अंकांवर पोहोचला होता. मनमोहन सिंगांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात सेन्सेक्सने गुंतवणूकदारांना भरपूर कमाई करून दिली.

कोणत्या वर्षी किती रिटर्न दिला?

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात 10 पैकी 8 वर्षात सकारात्मक रिटर्न दिला आहे. 2006 आणि 2007 या दोन्ही वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना 47 टक्के रिटर्न मिळाला.

2004 मध्ये 33 टक्के, 2005 मध्ये 42 टक्के, 2010 मध्ये 17 टक्के, 2012 मध्ये 26 टक्के आणि 2013 मध्ये 33 टक्के रिटर्न दिला. 2008 मध्ये जागतिक मंदीच्या काळात शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती.

डॉ. मनमोहन सिंग हे भारताचे 13 वे पंतप्रधान होते आणि ते भारताचे सर्वात जास्त काळ सेवा करणारे चौथे पंतप्रधान देखील आहेत. ते जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे आहेत.

शेअर बाजार तज्ज्ञ काय म्हणतात?

डॉ सिंग यांच्या निधनावर भाष्य करताना, जियोजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे व्हीके विजयकुमार यांनी एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, भारतातील उदारीकरणाचे शिल्पकार मनमोहन सिंग यांना देश श्रद्धांजली वाहत आहे. आज शेअर बाजार ज्या उंचीवर आहे, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे योगदान डॉ.मनमोह सिंग यांचे असल्याचे त्यांनी सांगितले.

1991 मध्ये उदारीकरण सुरू झाल्यापासून शेअर बाजारात 780 पट वाढ झाली आहे. 1991 मध्ये सेन्सेक्स 1,000 अंकांच्या आसपास होता, आता तो 78,000 च्या वर आहे.

पलक अरोरा चोप्रा, मास्टर कॅपिटल सर्व्हिसेसचे संचालक म्हणाले, 1991 च्या उदारीकरणानंतर भारतीय भांडवली बाजारातील बदलामध्ये डॉ. सिंग यांचे योगदान महत्त्वाचे आहे. ते म्हणाले की, मनमोहन सिंग यांनी देशाची परिस्थिती बदलली आणि आधुनिक भारताचा पाया घातला. ज्यामध्ये परवाना राज रद्द करणे, उदारीकरण, परदेशी भांडवल गुंतवणुकीला परवानगी अशा विविध धोरणांचा समावेश आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.