Who is Nitish Reddy: ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा नितीश रेड्डी आहे तरी कोण? वाचा कारकीर्द
: मेलबर्नच्या ऐतिहासिक क्रिकेट मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर स्टीव्ह स्मिथच्या शतकाच्या जोरावर 474 धावा केल्या. या सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत यांसारखे महान फलंदाज फ्लॉप झाले. या सामन्यात टीम इंडियाने 221 धावांवर 7 विकेट गमावल्या होत्या. यानंतर नितीश रेड्डी आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. सुरुवातीला त्याने सावध फलंदाजी केली, पण क्रिझवर स्थिरावल्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना घाम फोडला व शतक झळकावले.
नितीश रेड्डीचे वादळी शतक
या सामन्यात नितीश रेड्डीने कसोटी कारकिर्दीत प्रथमच अर्धशतक झळकावले. यानंतर तो इथेच थांबला नाही तर त्याने आपल्या अर्धशतकाचे शतकात रूपांतर करत टीम इंडियाला संकटातून बाहेर काढले. ऑस्ट्रेलियन भूमीवर कसोटीत क्रमांक 8 वर शतक झळकावणारा रेड्डी पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही.
चालू कसोटी मालिकेत पदार्पण
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात नितीश रेड्डीने पदार्पण केले. आतापर्यंत त्याने टीम इंडियासाठी 4 कसोटी सामन्यात एकूण 284 धावा केल्या आहेत. त्याने भारतासाठी तीन T20 आंतरराष्ट्रीय सामने देखील खेळले आहेत, ज्यात त्याने 90 धावा केल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत त्याने टीम इंडियामध्ये स्थान निर्माण केले आहे. तो आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळतो आणि गेल्या मोसमात त्याने इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयरचा पुरस्कारही जिंकला होता.
कोण आहे नितीश रेड्डी?
नितीश कुमार रेड्डी हा वेगवान गोलंदाजी करणार अष्टपैलू खेळाडू आहे. तो खालच्या फळीत स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. नितीश रेड्डी आंध्र प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. नितीश कुमार रेड्डीने 23 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 779 धावा करण्यासोबतच 56 विकेट्सही घेतल्या आहेत. 22 लिस्ट ए सामन्यांमध्ये नितीश कुमार रेड्डीने 403 धावा केल्या आहेत आणि 14 विकेट घेतल्या आहेत. नितीश रेड्डी हा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा अत्यंत विश्वासू खेळाडू आहेत. त्यामुळेच गौतम गंभीरने ऑस्ट्रेलियाच्या कठीण दौऱ्यावर नितीश कुमार रेड्डीला कसोटी पदार्पण करण्याची संधी दिली होती.