Nashik Municipal Hospital: इंदिरा गांधी रुग्णालयास एनआयसीयू सेंटरची गरज; पंचवटीकरांना इमारतीला नवीन रूपासह मनुष्यबळ वाढीची अपेक्षा
esakal December 28, 2024 07:45 PM

पंचवटी : पंचवटीकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उभारलेल्या इंदिरा गांधी रुग्णालयाच्या इमारतीच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने तिला अवकळा येण्याची स्थिती निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे इमारतीचे नूतनीकरण होऊन सुसज्ज रुग्णालय होणे गरजेचे आहे. या इमारतीला नवं रुपडं आणून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. या रुग्णालयात प्रसूती केल्या जातात, मात्र एनआयसीयू सेंटर नसल्याने रुग्णांची धावपळ होताना दिसते.

यासाठी खासगी रुग्णालयात जावे लागते. यामुळे इंदिरा गांधी रुग्णालयाला नूतनीकरण, एनआयसीयू सेंटर आवश्यक आहे. रुग्णालयात पंचवटीकरांसह आजूबाजूला भागातून बाह्य रुग्ण तपासणीसाठी नागरिक येतात. या रुग्णालयात मुख्यत्वे महिला प्रसूतीसाठी येतात. यात शहरालगत असलेल्या खेड्या-पाड्यातील ग्रामस्थांचाही समावेश आहे. पंचवटी कारंजा येथे इंदिरा गांधी रुग्णालयाच्या दर्शनी भागातील नामफलक तुटलेला आहे.

इमारतीला बाहेरील बाजूस तडे गेले आहेत. तळ मजल्यावर रेकॉर्ड रूम, एक्स रे सेंटर आहे. या ठिकाणी वाहने पार्किंग असून जुने पडीक साहित्य, यात टेबल खुर्च्या, काही बेड पडून आहेत. तसेच इमारतीच्या बऱ्याच भागातील खिडक्यांना काचा नाहीत. रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत लसीकरण केंद्र सुरू आहे. या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना बसण्यासाठी बाकड्याची संख्या कमी आहे. पहिल्या मजल्यावर इंदिरा गांधी रुग्णालयात प्रवेश आहे.

नोंदणी कक्ष, केस पेपर, प्रयोग शाळा फी भरणा केंद्र आहे. वैद्यकीय अधिकारी कक्ष, बालरोग कक्ष, औषधे, प्रयोगशाळा, बाह्य रुग्ण विभाग आहे. विडाल रक्त तपासणीसह जवळपास पाच ते सहा टेस्ट या बाहेर कराव्या लागतात. दुसरा मजल्यावर माता बाल संगोपन केंद्र, प्रसूती पूर्व तपासणी कक्ष सोनोग्राफी सेंटर आहे. एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र आहे.

पहिल्या मजल्यावर गॅलरीमध्ये नादुरुस्त स्ट्रेचर, त्यावर रुग्णाच्या खराब गाद्या धूळखात पडून आहेत. तिसऱ्या मजल्यावर जाताना जिन्यात थुंकून अस्वच्छता केलेली आहे. या मजल्यावर स्त्री वैद्यकीय व शस्त्रक्रिया कक्ष आहेत. यात १५ बेड आहेत. तसेच स्त्री प्रसूती पश्चात कक्ष आहे. यात १६ बेड आहेत. बेडवरील गाद्या जुन्याच आहे. तसेच मेडिकल व बाल रुग्ण कक्ष आहे. चौथ्या मजल्यावर वैद्यकीय अधिकारी कक्ष, डॉक्टर रूम व रिकव्हरी रूम आहे, शस्त्रक्रिया कक्ष आहे.

अडगळीमुळे डासांचा त्रास

इंदिरा गांधी रुग्णालयाच्या तळ मजल्यावर पार्किंग सुविधा केली आहे. या ठिकाणी एक्स रे रूमही आहे. मात्र, या ठिकाणी तुटलेले खुर्च्या, बाकडे, टेबल नादुरुस्त साहित्य ठेवले आहे. या ठिकाणी स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. यामुळे एक्स रे साठी येणाऱ्या रुग्णांना या अडगळीमुळे डासांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

नागरिकांच्या अपेक्षा

- इमारत दुरुस्ती अथवा नूतनीकरण व्हावी

- बेडची संख्या वाढवावी

- अत्याधुनिक सुविधा युक्त एन आय सी यू सेंटर

- महिलांसाठी आय सी यू सेंटर सुरू करावे

- रुग्णासोबत एका नातेवाइकाची राहण्याची सुविधा व्हावी

- रुग्णालयात मनुष्य बळ वाढवावे

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.