नाशिक रोड : विभागातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी महापालिकेने पूर्वीच्या बिटको हॉस्पिटलचे नवीन जागेत स्थलांतर करून त्यास भव्य रूप देत स्व. बाळासाहेब ठाकरे रुग्णालय नामकरण केले आहे. आकाराने मोठ्या असलेल्या या दवाखान्यात स्टेशनरीचा अभाव, सिटी स्कॅन बंद, रक्त-लघवी तपासणी अहवालास विलंब, चार फिजिशियन डॉक्टर असूनही ते राऊंडला येत नसल्याचा आरोप, मानधनावरील डॉक्टर्सचे सवडीनुसार काम, अस्वच्छता, अपुरे कर्मचारी अशा अनेक समस्या आहेत.
महापालिकेचे हे सर्वात मोठे रुग्णालय असून याच ठिकाणी अशी अवस्था आहे तर इतर रुग्णालयांची काय अवस्था असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रुग्णाला देण्यात येणारे केस पेपर संपल्याने साध्या कागदावरच नाव लिहून डॉक्टर औषधे लिहून देत असल्याचे दिसते. नाशिक रोड परिसरात आरोग्यवर्धिनी केंद्र उभारले आहेत, परंतु तेथे नेमणूक केलेले डॉक्टर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे तेथील रुग्ण बिटको हॉस्पिटलला येतात. यामुळे येथे केसपेपर व औषधे घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागतात.
शौचायलयांची दुरवस्था, पिण्याचे पाण्याची मशिन बंद अशा पायाभूत सुविधांचीही वानवा आहे. या रुग्णालयात नाशिक रोडसह ग्रामीण भागातील जेलरोड, देवळालीगाव, विहीतगाव, चेहेडी, पळसे, शिंदे, कोटमगाव, चांडेगाव, एकलहरे, नाणेगाव, लहवित, ओढा, शिलापूर, नांदूर-मानूर आदी भागांतील रुग्ण उपचारासाठी येतात. तसेच नाशिक-पुणे महामार्ग, जेलरोड आणि परिसरातील रस्त्यांवरील लहान-मोठ्या अपघातग्रस्तांना प्रथम या रुग्णालयात उपचारासाठी आणले जाते.
रूग्ण संख्येचा मोठा भार
सकाळ, सायंकाळ येथे ओपीडी सुरु असते. तसेच अपघात विभाग २४ तास सुरु असते. उपचारांसाठी दोनशेवर रुग्ण दाखल आहेत. तसेच दररोज साधारण ७०० ते ९०० बाह्य रुग्ण तपासणी होते. १००० वर दररोज केस पेपर लागतात. मात्र ते पुरविण्याबाबत महापालिका आरोग्य विभाग आणि महापालिका प्रशासन यांच्यात वाद असल्याचे सांगण्यात येते.
येथील तळ मजला बाह्यरुग्ण तपासणी, पहिला मजला मेडिकल महाविद्यालयासाठी दिला आहे. दुसरा व तिसरा मजलावर जनरल मेडीकल वॉर्ड व अतिदक्षता विभाग आहेत. या ठिकाणी कोटी रुपयांच्या मशिनरी पडून आहेत. गेल्या पाच सहा वर्षांपासून नवीन कोरी सोनोग्राफी मशिन रेडीओलॉजिस्ट नसल्याने बंद आहे. एम. डी. फिजिशियन, जनरल सर्जन, डॉक्टर कमी आहेत.
समाज मंदिराला विरोध
येथे कोरोना काळात स्वामी नारायण संस्थेने तीनशेवर खाटा दिल्या आहेत. तसेच विविध संस्थांकडून मेडिकल साहित्य येथे दिले आहे. रुग्णालयात स्वच्छतागृहांची दुरवस्था आहेत. येथील नळाचे तोट्या तुटलेल्या व काढून नेल्या आहेत. शौचालयात वेस्टर्न टॉयलेट असल्याने येथील रुग्ण व नातेवाइकांना उपयोग करता येत नाही, बाथरूमचे दरवाजे गायब आहेत.
थंड पाण्याचे मशिन बंद आहे. तळघरातील वाहन पार्किंगमध्ये घाणीचे साम्राज्य आहे. सात मजले मंजूर असलेल्या या दवाखान्याचे पाच मजले बांधलेले आहेत. कोरोना काळात विनाउद्घाटन हे हॉस्पिटल लोकसेवेत आले आहे. हॉस्पिटलच्या आवारात समाज मंदिराचे काम सुरु असून त्याला प्रशासनाचा व नागरिकांचा विरोध आहे.