डॉ. कैलास कमोद
उषःकाल होता होता काळरात्र झाली
अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली
स्वातंत्र्याची पहाट उगवली... सूर्य दिसला; पण तो फार थोड्यांना! कोट्यवधींपैकी फक्त काही शेकड्यांना. भारतीय माणसांचा खूप मोठा समूह सूर्यप्रकाशापासून वंचितच राहिला. त्यांच्या आयुष्यातला अंधकार दूर होऊ शकला नाही. जीवनातल्या प्राथमिक गरजांपासूनही वंचित राहिलेल्या मोठ्या जनसमूहाविषयी भाष्य या गीतात आहे. ‘अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली’ असं कवी सांगत आहे.
ज्यांना जग घडवायचं आहे किंवा जग बदलायचं आहे अशा क्रांतिकारकांच्या मनातली मशाल सतत पेटलेली असते. क्रांती कदाचित् आपल्या हयातीत घडणार नाही; पण आज ना उद्या; ती घडेलच, असा दुर्दम्य विश्वास त्यांच्या ठायी असतो. त्यामुळंच ते इतरांच्या मनातही तशी ती पेटवण्याचा प्रयत्न करत असतात.
धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे!
अजुन रक्त मागत उठती वधस्तंभ सारे!
आसवेच स्वातंत्र्याची अम्हाला मिळाली!
हे या काव्याचं शेवटचं कडवं आहे. आम्ही आमच्या जिवांचं बलिदान दिलं. आणि, आजही बळी जाणारे आम्हीच आहोत; किंबहुना बळी आमचाच दिला जात आहे. धुमसणाऱ्या चिता आमच्याच आहेत. स्वातंत्र्याचा पाऊस बक्कळ पडला. त्या पावसाचे दोन-तीन शिंतोडेसुद्धा आमच्या वाट्याला नाही आले. ‘आसवेच स्वातंत्र्याची अम्हाला मिळाली’, असा शेवट कवी करतो, तरी कवितेची ही जणू सुरुवात असावी अशी रचना आहे. जे घडलं ते असं आहे. ते का घडलं, कसं घडलं याचं विवेचन मात्र कवितेच्या सुरुवातीला केलं आहे.
अम्ही चार किरणांचीही आस का धरावी?
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी?
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली!
प्रकाशाचा एखादा कवडसा आमच्या वाट्याला येईल याची आम्ही आजही वाटच पाहत आहोत. ज्या सूर्यानं आमच्या आयुष्यात उजेड पाडावा अशी अपेक्षा होती, तोच आमच्यासाठी भरभरून काळोख घेऊन येत आहे. कट्यारींचे घाव अजूनही तसेच सोसत आम्ही जगत आहोत. बदललेत फक्त घाव घालणारे हात.
ते वेळोवेळी बदलत असतात. भोवतालच्या सापांचे विषारी डंख आम्ही अजूनही पचवत आहोत...‘अम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेतही न वाली’! प्रेतंसुद्धा जिथं आणली जात नाहीत अशा स्मशानांसारखं भकास आणि उजाड आयुष्य झालं आहे आमचं. दुर्दैव हे की, आमच्या अपार दु:खाचीही दलाली होते. त्याचं भांडवल करून दुसरेच गबर होतात. काल होते त्यांच्यापेक्षा उद्याचे वाईट निपजतात. परवाचे त्याहूनही वाईट असतात...‘कसे पुण्य दुर्दैवी अन् पाप भाग्यशाली’! पुण्य त्यांनाच मिळतं. आम्ही मात्र पापाचेच वाटेकरी.
जातीजातींचे संघर्ष, धर्माधर्मांमधले भेद अधिकाधिक धारदार आणि टोकदार होत आहेत. त्यांच्यात भरडले जाणारे आम्हीच असतो. राखरांगोळी होते ती आमच्याच संसाराची.
तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी
तेच दंश करिती आम्हा साप हे विषारी!
अम्ही मात्र ऐकत असतो आमुची खुशाली!
गरीब माणूस; मग तो ट्रॅफिक सिग्नलवर खेळणी विकणारा असेल, नंदीबैलवाला असेल, ऊसतोडणीमजूर असेल किंवा रिक्षाचालक असेल...त्याच्या जीवनाची परवड जशीच्या तशी सुरू आहे. त्याचं कुटुंब पोट कसं भरतं, देशाचे भावी नागरिक असलेली त्याची पोरं-बाळं शिक्षण कसं घेतात, त्यांना आरोग्याच्या प्राथमिक सोई मिळतात की नाही, अशा गोष्टींचा आपण आता विचार करेनासे झालो आहोत. अशा गोष्टींची चीड येण्याऐवजी रोज रोज तेच पाहून आपली मनंही मुर्दाड झाली आहेत.
स्वातंत्र्योत्तर भारत देशातल्या ‘नाही रे’ वर्गातल्या उपेक्षित नागरिकांची परवड कविवर्य सुरेश भट यांनी जळजळीत भाषेत व्यक्त केली आहे.(मार्च १९७० मध्ये प्रकाशित झालेल्या ‘रंग माझा वेगळा’ या काव्यसंग्रहात ही काव्यरचना समाविष्ट आहे. अनेक वर्षांपूर्वी लिहिलेलं हे काव्य आज, २०२४ मधल्या परिस्थितीलाही लागू होतं)
या संपूूर्ण गीताच्या प्रत्येक ओळीत ‘विद्रोह’ ठासून भरल्याचं दिसून येतं. कुठलाही बीभत्स शब्द न वापरता संयमित भाषेत प्रकट केलेला विद्रोह हे या गीताचं वैशिष्ट्य.‘आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली’ हे या गीताचं सार आज स्वातंत्र्योत्तर सत्त्याहत्तर वर्षांनंतरही तसंच आहे; किंबहुना अलीकडच्या काळात ते अधिक दाहक झालं आहे.
...तरीही धीर सोडायचा नाही. आशेच्या तेलावर प्रयत्नांची मशाल पेटती ठेवली पाहिजे. जग एका दिवसात बदलणार नाही. एखाद्यानं ते बदलण्याचा प्रयत्न सुरू केला तर तो लढा पुढच्यांनी सुरू ठेवला पाहिजे. तथागत गौतम बुद्ध, भगवान महावीर, गुरू नानकदेव आणि महात्मा गांधीजी आदींनी शांततेच्या आणि अहिंसेच्या मार्गानं हा संघर्ष सुरू ठेवला.
विद्रोहातून समाजाला बदलण्याचा विचार महर्षी चार्वाक यांनी दिला. संत ज्ञानेश्वरमहाराजांनी सामान्यांसाठी गीतेची कवाडं खुली करून ज्ञान आणि शिक्षण सामान्यांना वाटण्याचा प्रयत्न केला. संत तुकाराममहाराजांनी जीवनातलं वास्तव आपल्या अभंगांतून विशद करून मार्ग दाखवला. छत्रपती शिवाजीमहाराजांनी कुणब्यांना आणि मावळ्यांना घेऊन रयतेचं, म्हणजे शेतकऱ्याचं, राज्य स्थापन केलं. महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहूमहाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज सुधारून उपेक्षितांचं जीवन सुसह्य करण्यासाठी अधिकाधिक कठीण समस्यांना तोंड देत आपलं जीवन खर्च केलं.
गांधीजींसारख्या फकिरानं तर चरख्यातून क्रांती घडवली. उपेक्षितांच्या हालअपेष्टा अशाच कमी व्हाव्यात, त्यांचं जीवनमान उंचावावं यासाठी अब्राहम लिंकन, मार्टिन ल्यूथर किंग, नेल्सन मंडेला आदींनी जगभर प्रयत्न केले. या सर्वांनी खचून न जाता आयुष्याची मशाल पेटती ठेवली. कवितेतून भीषण वास्तवाचं चित्रण लिहूनही कविवर्य भट उमेद न सोडता ‘अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली’ असा संदेश देतात तो याचसाठी मोलाचा आहे.
सन १९७९ मध्ये ‘सिंहासन’ या राजकीय पार्श्वभूमीच्या सिनेमातून हे गीत सादर झालं होतं. पत्रकार दिगू खांद्यावर शबनम पिशवी अडकवून आजूबाजूला पाहत पाहत रस्त्यानं चालला आहे. त्याच्या नजरेला जी जी दृश्यं दिसतात त्या पार्श्वभूमीवर हे गाणं ऐकू येतं. मुंबईच्या मरिन ड्राईव्हचा क्वीन्स नेकलेस एका बाजूला, तर बकाल झोपडपट्ट्या दुसऱ्या बाजूला...मोठा बोजा असलेल्या हातगाड्या ओढणारे हमाल एका बाजूला, तर उंची गाड्यांचा ताफा दुसऱ्या बाजूला...उकिरड्यावर अन्नाचे कण शोधणारी उघडी-नागडी पोरं...असं विदारक आणि विरोधाभासी चित्र पत्रकाराच्या नजरेतून दिगू पाहतो आहे.
मराठी सिनेमांत नेहमीच खलनायकाची भूमिका करणारे हरहुन्नरी अभिनेते निळू फुले यांनी दिगू या पत्रकाराची भूमिका फर्मास केली होती. खासगी जीवनात अतिशय सभ्य, सुसंस्कृत, मृदू स्वभावाच्या आणि सामाजिक जाणीव असलेल्या निळू फुले यांची पडद्यावरची प्रतिमा मात्र फार नकारार्थी बनली होती. ती या ‘सिंहासन’ सिनेमामुळं काहीशी बदलली.
गायिका आशा भोसले यांनी या गीताचा वेग छान सांभाळला आहे. ‘अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली’ ही ओळ गाताना श्रोत्यांच्या मनात चलबिचल होईल असा परिणाम त्यांनी आपल्या स्वरातून साधला आहे. पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या स्वरातला कोरस प्रत्येक ओळीला साथ देतो. कोरसच्या या स्वरातून संगीतकार हृदयनाथ मंगेशकर हे दर्शवतात की, हा ‘आवाज’ कुण्या एकानं उठवलेला असला तरी हा देशातल्या सामान्यातल्या सामान्य स्त्री-पुरुषांचा हा ‘आवाज’ आहे. ढोलकचा चांगला वापर करत हृदयनाथ यांनी अपेक्षित परिणाम साधला आहे.
‘सिंहासन’ हा महाराष्ट्रातल्या राजकारणावर आणि समाजकारणावर प्रभावी भाष्य करणारा सिनेमा होता. विषमत आणि दारिद्र्य ह्यांत पिचणारी जनता एका बाजूला आणि उंच इमारतींसारखी उच्चभ्रू सामाजिक रचना, तसंच राजकीय कुरघोड्या करून स्वत:चं साम्राज्य निर्माण करणारे आधुनिक सरदार आणि ‘आहे रे’ वर्गातले समृद्धीत लोळणारे त्यांचे पाठिराखे दुसऱ्या बाजूला...आणि, त्यांच्या गुंडाई-पुंडाईला असलेला राजकीय वरदहस्त... या सगळ्यावर बारकाईनं भाष्य करणारा हा आगळावेगळा सिनेमा होता.
आपल्यासारख्या सामान्य माणसाला देशातलं हे चित्र रोज पाहावं लागतं...हताश होऊन, अगदी अलिप्तपणे. सन १९७९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सिंहासन’ या सिनेमातल्या गीताद्वारे हे भाष्य आपल्यासमोर आलेलं असलं तरी आजही सन २०२४ मध्ये परिस्थितीत कोणताही फरक पडलेला नाही.
महाराष्ट्रात पुरोगामी लोकशाही दलाचं सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यामुळे हा सिनेमा चित्रित आणि वितरित होऊ शकला होता. हे गीत साठच्या दशकात लिहिलं गेलेलं आहे. हे गीत इंदिरा गांधी यांनी आणलेल्या १९७५ च्या राष्ट्रीय आणीबाणीवर लिहिलं गेलं असल्याचा प्रवाद होता. मात्र, तो स्वतः कविवर्य सुरेश भट यांनीच तेव्हा खोडून काढला होता.
***
(‘सिनेसंगीतातली गाणी’ या विषयावर वेगळं काही लिहून ते देण्याचा प्रयत्न मी ‘भॅंवरे की गुंजन...’ या सदरातून गेलं वर्षभर केला. ‘सकाळ’च्या रसिक-वाचकांनी या सदराला उदंड प्रतिसाद दिला. या उपक्रमात डॉ. हिरेन निरगुडकर (पुणे), बशीरभाई पेंढारी (सांगली), रमेश अहिरे (नाशिक) आणि अरविंद तायडे (यवतमाळ) या मित्रांचं मोठं सहकार्य लाभलं. या सर्वांचा आणि रसिक-वाचकांचा मी आभारी आहे. - डॅा. कैलास कमोद, नाशिक.)
(हे साप्ताहिक सदर आता समाप्त होत आहे.)