Thirty First ला 'जास्त' झाली; तर आता 'डोंट वरी', हॉटेलचे व्यक्तीच गाडीतून तुम्हाला सोडणार घरी!
esakal December 31, 2024 04:45 AM

नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनची उलटी गिनती सुरू झाली आहे. उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलीस सज्ज आहेत. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात प्रत्येक कानाकोपऱ्यात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. लोकांनाही उत्सवादरम्यान कायदे आणि नियमांचे पालन करून जबाबदार राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हॉटेल मालकांनी देखील विशेष तयारी केली आहे. थर्टी फर्स्टला "जास्त झाली" तर हॉटेल तुम्हाला त्यांच्या गाडीतून घरी सोडणार आहे.

पुणे हॉटेल्स असोसिएशनने हा अंशतः निर्णय घेतला आहे. पुण्यातील काही रेस्टॉरंट आणि हॉटेलकडून थर्टी फर्स्ट निमित्त नागरिकांना घरी सोडण्याची सुविधा देण्यात येणार आहे. ३१ डिसेंबर रोजी सुरू झालेली पार्टी १ जानेवारी पहाटे ५ पर्यंत करता येणार आहे. काही हॉटेल, रेस्टॉरंट तुमचे वाहन दुसऱ्या दिवशी आणून देण्याची सुविधा सुद्धा देणार आहे.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्व जण सज्ज झाले. पुण्यात अनेक ठिकाणी विविध प्रकारांच्या पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी पुण्यातील हॉटेल्स,पब चालकांकडून मोठी तयारी करण्यात आली आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री पार्टी करत असताना अनेक जण दारू पिऊन गाडी चालवतात परिणामी अपघातांचे प्रमाण वाढतं. ही बाब लक्षात घेता आत्ता पुणे हॉटेल्स असोसिएशनच्या वतीने काही नियम बनवले आहेत.

ड्रिंक जास्त झाल्यास आत्ता हॉटेल, रेस्टॉरंट अशा व्यक्तींना स्वतः च्या पैशाने कॅब करून घरी सोडणार आहेत. आणि गिऱ्हाईक यांनी त्यांच्या गाडीची चावी ठेवली तर ती गाडी सुद्धा त्यांना पोहच केली जाईल, अशी माहिती हॉटेल्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी दिली आहे. तर खासगी पार्ट्यांमध्ये अमली पदार्थांचे सेवन सर्रासपणे सुरू असून याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.