मुंबई : चित्रीकरण आटोपून घराकडे निघालेल्या अभिनेत्री ऊर्मिला कानेटकर-कोठारे यांच्या मोटारीला शुक्रवारी (ता. २७) रात्री साडेबाराच्या सुमारास कांदिवली पूर्वेकडील पोईसर मेट्रो स्थानकाजवळ अपघात झाला. या अपघातात मेट्रोचे काम करणारा एका कामगाराचा मृत्यू झाला तर अन्य एका कामगारासह ऊर्मिला आणि त्यांचा मोटार चालक असे तिघे जखमी झाले आहेत. या प्रकरणी चालकाविरोधात समता नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पश्चिम द्रुतगती मार्गावर पोइसर मेट्रो स्थानकाचे काम सुरू आहे. त्याठिकाणी काही कामगार काम करत होते. शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ऊर्मिला यांच्या भरधाव कारने तेथील जेसीबीला धडक दिली. त्यामुळे कारमधील एअर बॅग उघडल्याने कारचालक आणि ऊर्मिला थोडक्यात बचावल्या. या अपघातात कारने दोन कामगारांनाही धडक दिल्याने त्यात एकाचा मृत्यू झाला तर अन्य एक जखमी झाला आहे.
त्यास उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मेट्रो स्थानकाखाली काम करणारा जेसीबी अचानक रस्त्यावर आला त्यामुळे भरधाव वेगात असलेली कार लगेच थांबविणे अशक्य असल्याने तिने जेसीबीला धडकली. जेसीबीला धडक दिल्यावर कारचे एअरबॅग्स लगेच उघडल्याने ऊर्मिला आणि कारचालक थोडक्यात बचावले. ऊर्मिला या सुखरूप असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पती व अभिनेते आदिनाथ कोठारे यांनी दिली.