- प्रा.विशाल गरड, vishalgarad.18@gmail.com
सासू-सुनांची भांडणं हा अनादीकालापासून सुरू असलेला संघर्ष आहे. त्यांच्या भांडणांचा उल्लेख पुराण कथांपासून ते संतांच्या अभंगांपर्यंत आढळतो. हल्ली तर हा संघर्ष इतक्या टोकाला जाऊन पोहोचला आहे, की नव्या सूनबाई आम्हाला सासूच नको अशा अटी ठेवत आहेत. हे नेमकं का घडतंय ? याचा विचार केला, की याचे उत्तर एका शब्दात मिळते आणि ते म्हणजे ‘जनरेशन गॅप’.
होय आज्जी, आई आणि बायको या तीन पिढ्यांमधील काळ, त्या समकाळात झालेले संस्कार व मिळालेले शिक्षण. बस्स, एवढ्या गोष्टीनं माणसाचं जगणं आणि वागणं बदलून गेलं. बदल हा निसर्गाचा नियम आहे पण तोच बदल जर सासू-सुनांच्या मानसिकतेत नाही झाला, तर हा संघर्ष असाच सुरू राहील.
घरातल्या कर्त्या मुलानं नेमकं कुणाचं ऐकायचं? त्याच्यावर कुणी राज्य करायचं? यासाठी त्याच्या आईची आणि बायकोची खटपट सुरू असते. लग्नाआधी आईला विचारल्याशिवाय कोणतीही गोष्ट न करणारा मुलगा लग्नानंतर मात्र जेव्हा त्याच्या बायकोचे ऐकायला लागतो, तेव्हा लगेच तो बायकोचा गुलाम वगैरे झाला असे टोमणे मारले जातात.
काही घरातील सासवा नव्या सूनबाईला जणू घरातील मोलकरीण आहे, असेच वागवत असतात. तशा सासवांना स्वतःच्या सुनेची दुसऱ्यांच्या सुनांसोबत सतत तुलना करण्याची सवय असते. नव्या सुनेकडून अपेक्षांचा एवढा डोंगर उभा केला जातो, की नंतर त्यातून फक्त दगडेच बाहेर पडू लागतात.
माझ्या मुलीचे तिच्या सासरी खूप चांगलं आहे. दोघेच नवरा बायको राहतात, जावई लय गुणाचा आहे, लेकीचे सगळं ऐकतो. धुणे भांड्याला बाई असते त्यांच्यात, पोरगी निवांत आठनऊ वाजता उठते,' असे पाहुणे रावळ्यांना अभिमानाने सांगणाऱ्या सासवा सुनेबद्दल बोलताना मात्र 'आमची सून अख्खा गाव उठल्यावर उठते बाई, आमच्या वेळेस तर तांबडं फुटायच्या आधी स्वयंपाक व्हायचा आणि बघा या आताच्या पोरी. नवऱ्याला नुसतं धाकात ठिवत्यात,' असे बोलतात. मग याच गोष्टी सासू-सुनेच्या भांडणाचा दारूगोळा ठरतात आणि घरात रोज फटाकड्या फुटतात.
अहो, सासूबाई. तुमचा काळ वेगळा होता, त्या वेळची परिस्थिती वेगळी होती, त्या वेळचे शिक्षण वेगळे होते आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्या वेळी आई करत असलेली तिच्या लेकीवरचा संस्कारपण वेगळा होता. आता एवढे सगळे जर वेगळे असेल, तर नव्या जमान्यातली ती पोरगी तुमच्या घरात येऊन तुमच्यासारखेच थोडी घर सांभाळू शकेल.
तुमच्या काळात लेकराबाळांसाठी तुम्ही घेतलेले कष्ट, तुम्ही खाल्लेल्या खस्ता, त्याच्या जडणघडणीत तुम्ही दिलेले योगदान कुणीच नाकारू शकत नाही पण त्या मुलाच्या आयुष्यात जेवढा रोल आईचा असतो, तेवढाच बायकोचाही असतो. त्या दोघीही त्याच्यासाठी समान महत्त्वाच्या असतात. सुरुवातीच्या अर्ध्या आयुष्यात त्याला आईची साथ मिळते आणि उरलेल्या अर्ध्या आयुष्यात बायकोची सोबत मिळते. पण तुमच्या दोघींच्या भांडणात त्याची मानसिकता किती खराब होते, याचाही कधी विचार करत जा.
हल्ली सगळ्या मुलींना शहरात जावं वाटतं, घरात सासू नकोशी वाटतं, याचं मुख्य कारण सासूच्या अपेक्षा असतात. सासूला वाटते मी कशी पहाटे उठते, झाडून काढते, सडापाणी करते, स्वयंपाकाला लागते तसेच आता सुनेने करावे. पण अशी अपेक्षा करत असताना त्याच सासूने तिच्या मुलींना मात्र कामापासून दूर ठेवलेले असते. तू अभ्यासावर लक्ष दे, मी आहे ना काम करायला.
मग असाच संस्कार जर तुमच्या सुनेलाही तिच्या आईकडून मिळाला असेल, तर ती तुमच्या बरोबरीने कशी काय काम करू शकेल ? जुन्या बायका शारीरिक कष्टाला खमक्या आहेत, धुणे-भांडी करणे, स्वयंपाक करणे, स्वच्छता करणे हे त्यांच्या जन्मापासून अंगवळणी पडलेलं असतं पण हीच कामं करताना हल्लीच्या सुना नाक मुरडतात आणि हेच पाहून मग सासू-सुनांच्या भांडणाच्या ठिणग्या पडतात.
आई माया लावते तर बायको प्रेम देते पण या दोघी जेव्हा एकमेकींना भांडत बसतात, तेव्हा सर्वांत जास्त दुःख त्या पोराला होत असते. कारण या दोन्ही तलवारी त्याला एकाच म्यानात हव्या असतात म्हणूनच त्याला हे युद्ध निमूटपणे बघत बसण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. पोराच्या डोक्यावर अक्षता पडला की एका दिवसात घराची मालकीण बदलते, ही गोष्ट बऱ्याच सासवांना पचत नाही.
काही जणी तर शेवटपर्यंत घराचा कारभार सुनेच्या हातात देत नाहीत. राजकारणासारखाच सत्तासंघर्ष घराघरातही सुरूच राहतो. प्रत्येक लग्न झालेल्या पुरुषाला आईची दोन रूपे पाहायला मिळत असतात. एक लग्नाआधीची आई आणि लग्नानंतरची आई. तिच्या स्वभावातला तो बदल प्रत्येक पुरुष अनुभवत असतो. बायकोच्या चुका सांगणारी आई आणि आईच्या चुका सांगणारी बायको यामध्ये पुरुषांनी तोंड न उघडता फक्त ऐकून घेण्यातच भले असते अन्यथा रोजच घडणाऱ्या महाभारताचे चक्रव्यूह भेदणे अशक्य होईल.
भविष्यात सासू-सुनांचा संघर्ष टाळायचा असेल, तर नव्या सूनबाईने सासूच्या कामाचा आदर करायला हवा आणि सासूने सुनेच्या शिक्षणाचा आदर करायला हवा. सध्याची स्त्री ही चूल आणि मूल या संकल्पनेच्या खूप पुढे निघून गेली आहे. तिला पुन्हा त्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असेल, तर ती बंड करेल. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आम्ही आपल्या परंपरा आणि संस्कार मागे टाकत चाललोय पण सासूबाईंकडे त्याचा समृद्ध वारसा आहे.
आपल्या लेकरांसाठी ती आजी म्हणून जे करतेय ते पैसे देऊन कामावर ठेवलेली बाई नक्कीच करू शकत नाही, हेही सुनांनी लक्षात घ्यावे. भांडणे होणे हे नाते जिवंत असल्याचे लक्षण असते. जरूर भांडा पण इतकेही नको की ज्याच्या जिवावर हे सगळं सुरू आहे, तोच तुटून जाईल.
(लेखक हे प्रसिद्ध व्याख्याते आणि इतिहास व विविध सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)
लेखक संपर्क क्रमांक : ८८८८५३५२८२
(हे साप्ताहिक सदर आता समाप्त होत आहे.)