-सचिन निकम
लेंगरे : ‘कुणी घर देता घर?’ या ‘नटसम्राट’मधील स्वगताप्रमाणेच ‘आमच्या उसाला कुणी टोळी देता का टोळी,’ अशी म्हणण्याची वेळ उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. जानेवारी उजाडत आला तरी उसाला कारखान्याकडून तोड मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी चांगलेच हतबल झाले आहेत. परिसरातील कार्यक्षेत्रात सर्व कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. त्यामुळे उसाला तोड मिळविण्यासाठी शेती अधिकारी, चिट बॉयची मनधरणी करावी लागत असल्याने तोड मिळेल का नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
आधीच विधानसभा निवडणुकीमुळे कारखाने उशिरा सुरू झाले आहेत. त्यात ऊसतोड करणाऱ्या मजुरांची वानवा असल्यामुळे उसाला तोड मिळणे जिकिरीचे झाले आहे. परिसरातील लेंगरे, भूड, मादळमुठी, देविखिंडी, वेजेगाव, माहुली, नागेवाडी, भाग्यनगर, साळशिंगे परिसरात ‘टेंभू’चे पाणी फिरल्याने या भागात मोठ्या प्रमाणात उसाची लावण करण्यात आली.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आडसाली उसाची लावण जास्त करण्यात आली आहे. उसाचे पीकही जोमात आले होते; परंतु परतीच्या पावसामुळे ऊस उत्पादकांचे कंबरडे मोडले. सततच्या पावसाने शेतात पाणी साचून राहिल्याने उसाला तुरे पडण्यास सुरवात झाली आहे. उसाचे शेत कापसाच्या शेतासारखे पांढरेशुभ्र दिसू लागले. पीक शास्त्रानुसार उसाला तुरा पडल्याने ऊस आतून तार तयार होऊन बांबूप्रमाणे पोकळ होत असल्याने उसाच्या उताऱ्यात, वजनात घट होण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सोसावा लागणार आहे.
कार्यक्षेत्रातील ‘यशवंत’, ‘विराज खांडसरी’, ‘उदगिरी’ या तिन्ही कारखान्यांचे धुराडे पेटले आहे. गेल्या हंगामाप्रमाणेच ‘यशवंत’, ‘विराज’, ‘उदगिरी शुगर’ हे कारखाने शेतकऱ्यांना तारतील अशी आशा होती. उसाला तोडच मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी पडले आहे.
चालू हंगामात कार्यक्षेत्राव्यतिरिक्त ‘गोपूज’, ‘डोंगराई’ या कारखान्यांची बिले वेळेत होत नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याकडे पाठ फिरवली आहे. सुरू असलेल्या कारखान्यांकडून येत असलेल्या ऊस तोड टोळ्यांचे लाड पुरवता, पुरवता शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येऊ लागले आहे. अवकाळी, पूर यामुळे उसाला फटका बसला असला तरी या सर्वांचा कारखानदारावर कोणताही फरक पडला नाही.
अस्मानी संकटाचा त्रास शेतकऱ्यांच्या पदरी पडला आहे. यातच ऊसदराची कोंडी न फुटल्याने दर काय देणार, या विषयीही संभ्रमावस्था आहे. ऊसतोड मिळविण्यासाठी स्थानिक गाव पुढाऱ्यांपासून नेत्यांपर्यंत फिल्डिंग लावून काही शेतकऱ्यांनी टोळ्या आणल्या आहेत.