बीड – बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड पुढील 24 तासांत आत्मसमर्पण करण्याची शक्यता आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक झाली असून मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड अजून फरार आहे. त्याच बरोबर हत्याप्रकरणातील आणखी तीन जण पोलिसांच्या ताब्यात आलेले नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. सीआयडी या प्रकरणाचा तपास करत असून त्यांनी आता आरोपींभवती फास आवळायला सुरुवात केली आहे. वाल्मिक कराडची आर्थिक नाकेबंदी केली आहे. त्याची पत्नी मंजिली कराड हिचीही पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. आता आरोपींच्या संपत्तीवर टाच आणण्याची तयारी सुरु आहे. त्यामुळे पुढील 24 तासांत वाल्मिक कराड पोलीसांना शरण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
– Advertisement –
वाल्मिक कराडवर संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा नाही. संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या वादाच्या मुळाशी वाल्मिक कराडचा संबंध असल्याचा आरोप आहे. पवनचक्की कंपनीकडे दोन कोटींची खंडणी मागितल्याचा वाल्मिक कराडवर आरोप आहे. तर, वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख हत्याकांडाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा खास कार्यकर्ता असल्यामुळे त्याला अभय मिळत असल्याचा आरोप मस्साजोगचे ग्रामस्थ आणि विरोधी पक्षाचे नेते करत आहेत. तर भाजप आमदार सुरेश धस यांच्या आरोपांचा रोखही धनंजय मुंडे यांच्याकडे आहे. विरोधी पक्षाने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्रिमंडळात आहेत तोपर्यंत संतोष देशमुख यांना न्याय मिळू शकत नाही, अशी विरोधकांची मागणी आहे.
राज्य सरकारने संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे दिला आहे. बीड पोलीस अधीक्षकांची बदली करण्यात आली, त्यांच्या जागेवर आता नवनीत कावत हे आयपीएस अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. सीआयडीचे बडे अधिकारी संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी बीडमध्ये तळ ठोकून आहेत. सीआयडीचे 9 पथक आणि बीड पोलिसांचे 150 अधिकारी, कर्मचारी या प्रकरणाचा दिवसरात्र तपास करत आहेत.
– Advertisement –
सीआयडीने वाल्मिक कराडसह संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधीत सर्व संशयित आरोपींची बँक खाती गोठवली आहेत. आरोपींची आर्थिक नाकेबंदी करण्यात आली आहे. यानंतर आरोपींच्या नातेवाईकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. वाल्मिक कराडची पत्नी मंजिली हिचीही सीआयडीने कसून चौकशी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) जिल्हाध्यक्ष, युवती जिल्हाध्यक्ष संध्या सोनवणे यांचीही चौकशी करण्यात आली आहे. सीआयडी आणि पोलीसांनी आतापर्यंत 100 हून अधिक लोकांची चौकशी केली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांचे काळ्या स्कॉर्पिओमधून अपहरण करण्यात आले होते. ती गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. त्या गाडीची सीआडीकडून कसून तपासणी सुरु आहे. स्कॉर्पिओमध्ये मिळालेले हाताचे ठसे हे हत्या प्रकरणातील हातांच्या ठशांशी जुळले आहेत. पोलीसांना तीन मोबाईल देखील सापडले आहे. हे मोबाईल तपासणीसाठी न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) विभागाकडे देण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामनियांचा आरोप आहे की, या मोबाईलवर एका बड्या नेत्याचे फोन आले होते. या मोबाईलचे सीडीआर तपासले पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्य सरकारच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सरकारमधील मंत्रीच संशयाच्या घेऱ्यात येत आहे. यामुळे सर्व यंत्रणा कामाला लावून आरोपींना ताब्यात घेण्याची तयारी गृहविभागाने सुरु केली आहे. त्यामुळे येत्या 24 तासात वाल्मिक कराडसह फरार आरोपी शरण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा : Sushma Andhare : संतोष देशमुख हत्या प्रकरण बाजूला करण्यासाठी…; काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
Edited by – Unmesh Khandale