अहिल्यानगर - शहरातील मोकाट जनावरांमुळे नागरिकांना दररोज मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यात काहींनी भर शहरात गोठे उभारले आहेत, तर काहीजण चक्क सार्वजनिक ठिकाणी जनावरे बांधत आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.
बंगाल चौकी परिसरात बस थांब्यामध्ये जनावरे बांधणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी जनावरे बांधल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.
बंगाल चौकी परिसरात बस थांब्याच्या शेडमध्ये, रस्त्यावर सार्वजानिक ठिकाणी सातत्याने जनावरे बांधणाऱ्या संबंधितांना महानगरपालिकेने वारंवार सूचना दिल्या होत्या. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील केली होती. परंतु या कारवाईला न जुमानता रस्त्यावर सार्वजानिक ठिकाणी जनावरे बांधली जात होती. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने या जनावराच्या मालकावर गुन्हे दाखल केले आहेत.
बंटी श्रीनिवास वायकर (रा. बंगाल चौकी) असे गुन्हा दाखल झालेल्या जनावरांच्या मालकाचे नाव आहे. रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणे जनावरे बांधणाऱ्या जनावरांच्या मालकावर यापुढे अशाच प्रकारे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे आयुक्त डांगे यांनी स्पष्ट केले आहे.
बंगाल चौकी परिसरात बस थांब्यावर व रस्त्यावर सातत्याने जनावरे बांधली जातात. या ठिकाणी जनावरांना नुकसान पोहोचविणाऱ्या घटनाही वारंवार घडलेल्या आहेत. महानगरपालिकेने या जनावरांच्या मालकावर यापूर्वीही कारवाई केलेली आहे. मात्र महानगरपालिकेच्या दंडात्मक कारवाईला न जुमानता वारंवार रस्त्यावर जनावरे बांधली जात असल्याने अखेर महानगरपालिका प्रशासनाने कठोर पावले उचलत संबंधित जनावराच्या मालकावर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शहरात अनधिकृत तीनशे गोठे
शहरात जनावरांचे सुमारे तीनशे लहान- मोठे गोठे आहेत. महानगरपालिका हद्दीत असे गोठे उभारणे बेकायदेशीर आहे. असे असतानाही मध्यवर्ती शहरासह उपनगरात हे गोठे उभारण्यात आलेले आहेत. महानगरपालिका अशा गोठे असलेल्या मालकांवर कारवाई का करत नाही? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. कोंडवाडा विभागाच्या वतीने मोकाट जनावरे पकडण्याची कारवाई सातत्याने सुरू राहणे आवश्यक आहे, अशी मागणी नागरिक करत आहेत.
तर गुन्हे दाखल करणार
जनावराच्या मालकांनी आपली जनावरे आपल्या स्वतःच्या जागेत सुरक्षित ठिकाणी बांधावीत. रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, इतर नागरिकांना त्रास होईल, उपद्रव निर्माण होईल अशा पद्धतीने रस्त्यावर जनावर बांधू नयेत. अन्यथा महानगरपालिकेच्या कोंडवाडा विभागामार्फत दंडात्मक कारवाई केली जाईल. वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्यास जनावराच्या मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असे आयुक्त डांगे यांनी स्पष्ट केले आहे.
मोकाट जनावरांचा त्रास
शहरात अनेक ठिकाणी मोकाट जनावरे रस्ते अडवितात. कधी कधी तर ही जनावरे रस्त्याच्या मधोमध बसतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. महानगरपालिकेच्या कोंडवाडा विभागाच्या वतीने ही मोकाट जनावरे पकडून ती कोंडवाड्यात ठेवली जातात.
परंतु ही कारवाई सातत्याने होत नसल्याने मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यात काहीजण तर म्हशींची कळपं घेऊन रस्त्याने जातात. या म्हशींचा धक्का लागून अनेक लहान-मोठे अपघात झालेले आहेत. अशा जनावरांच्या मालकांवर देखील कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.